सासरा परिसरात डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक
By Admin | Updated: August 28, 2014 23:34 IST2014-08-28T23:34:39+5:302014-08-28T23:34:39+5:30
साकोली तालुक्यातील सासरा येथे पुन्हा एकदा डेंग्यूची साथ पसरली आहे. येथील दोन रुग्णांच्या चाचणीमध्ये डेंग्यूचे विषाणू आढळून आले. त्यांना नागपूर, साकोली येथे हलविण्यात आले आहे.

सासरा परिसरात डेंग्यूसदृश आजाराचा उद्रेक
सासरा : साकोली तालुक्यातील सासरा येथे पुन्हा एकदा डेंग्यूची साथ पसरली आहे. येथील दोन रुग्णांच्या चाचणीमध्ये डेंग्यूचे विषाणू आढळून आले. त्यांना नागपूर, साकोली येथे हलविण्यात आले आहे.
उन्हाळ्यात येथे डेंग्यूसदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले होते. रुग्णांमध्ये ६ ते १५ वयोगटातील बालके होते. डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सरपंच योगराज गोटेफोडे व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामचंद्र बोरकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला लेखी कळविले होते. त्यानंतर वैद्यकीय चमूने गावाला भेट दिली. नागरिकांना स्वच्छतेचा व आरोग्याचा संदेश देत जनजागृती केली. फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी केली. डेंग्यूसदृष्य आजार आटोक्यात आला. परंतु पावसाळ्याच्या दिवसात या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या या आजाराचे दोन रुग्ण आढळले असून अधिक रुग्ण असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यात डेंग्यूला प्रसारीत करणारा एडीस डास असल्याचे नाकारता येत नाही. परिसरातील बहुतेक गावात डेंग्यूसदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले. परिसरातील कटंगधरा, न्याहारवाणी, विहिरगाव, सानगडी, सानगाव, शिवणीबांध आदी गावात रुग्ण आहेत. सानगडी येथे डेंग्यूसदृष्य आजाराचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी काही रुग्ण नागपूर, भंडारा, साकोली, सानगडी येथे उपचार घेत आहेत.
सासरा परिसरातील गावांमध्येही आरोग्य शिबिर लावण्याची मागणी आहे. या गावात धूरफवारणी आवश्यक आहे. या आजारावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा अयशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी बहुतेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. परिसरात वाढते रुग्ण लक्षात घेता या आजाराने नागरिक भयभीत झाले आहेत.
शहरातील रस्त्यांची दुर्गती व त्यावर पडलेल्या खड्यांंमध्ये पावसाचे पाणी साचून आहे. यात डासांची उत्पत्ती होत आहे. यावरही पालिकेकडून पाहिजे तशी फवारणी व कीटकनाशक पावडरचा मारा केला जात नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी शहरात डासांचा प्रकोप वाढला असून शहरवासी त्रस्त झाले आहेत. हिवताप कार्यालयाकडून किडनाशक द्रव्य पुरविण्यात आले असतानाही फवारणी होत नसल्याचे चित्र येत आहे. (वार्ताहर)