दोन वर्षांत डेंग्यूने सहा जणांचा मृत्यू
By Admin | Updated: May 16, 2016 00:41 IST2016-05-16T00:41:18+5:302016-05-16T00:41:18+5:30
डासांपासून होणाऱ्या ‘डेंग्यू’ या जीवघेणा आजाराचा मागील दोन वर्षांत १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

दोन वर्षांत डेंग्यूने सहा जणांचा मृत्यू
राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण दिवस आज : केंद्र सरकारच्या निर्देशानंतर आरोग्य विभाग करणार जिल्ह्यात जनजागृती
भंडारा : डासांपासून होणाऱ्या ‘डेंग्यू’ या जीवघेणा आजाराचा मागील दोन वर्षांत १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. आता या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानंतर भंडारा जिल्हा आरोग्य विभागाने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे.
केंद्र सरकारच्या कीड नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संवेदनशील गावात जनजागृतीसाठी प्रभावी योजना आखण्यात आली आहे. त्याअनुषंगाने १६ मेपासून राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती रॅली आयोजित करणे आणि डास निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायती करणार धूरफवारणी
ग्रामपंचायतींना त्यांना मिळणाऱ्या निधीतून धूर फवारणी मशिन खरेदी करणे आणि त्याचा नियमित उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सेवा विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी डेंग्यू या आजाराचा उद्रेक होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले आहे. याशिवाय संवेदनशील भागात डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभागातून जनजागृती हे प्रभावी असून जिल्ह्यात या आजारांमुळे ३६ गावे संवेदनशील आहेत. या गावात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या अभियानात डेंग्यूपासून बचाव करणे, डासांची पैदास रोखणे, कोरडा आठवडा पाळणे व डासांपासून आजार रोखण्यावर भर दिला जात असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी सांगितले.
वर्षभरात सुक्ष्म नियोजन
डेंग्यू या आजारावर नियंत्रणासाठी जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात डेंग्यूशिवाय डास व किटकापासून होणारे हिवताप, मेंदूज्वर, चंडीपुरा, चिकनगुनिया या आजाराच्या निर्मूलनासाठी आरोग्य केंद्राच्यास्तरावर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने ‘इंडिया फाईट्स डेंग्यू’ अॅप सुरू केले आहे. त्या धर्तीवर भंडारा आरोग्य विभागाने ‘एनव्हीबीडीसीपी’ या नावाने ग्रुप बनविला आहे. त्या माध्यमातून या आजार निर्मूलनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. डी. झलके यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात १२ वेळा झाला होता उद्रेक
डासांपासून होणारा ‘डेंग्यू’ हा जीवघेणा आजार आहे. मागील दोन वर्षात या आजाराचा १२ वेळा उद्रेक झाला. यात सहा जणांचा जीव गेला. २०१४-१५ या वर्षात डेंग्यूचा ११ ठिकाणी उद्रेक झाला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी ५५५ रूग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६५ रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला होता. डेंग्यू या जीवघेण्या आजाराची भयावहता लक्षात घेता जिल्ह्यातील संवेदशील ३६ गावात डेंग्यू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. सन २०१५-१६ या वर्षात डेंग्यूचा केवळ एक उद्रेक नोंद करण्यात आला. यावेळी २३ जणांचे रक्तनमुने तपासणीठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आली होती. या वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक झाला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.