डेंग्यू, हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:06 IST2019-07-26T01:05:14+5:302019-07-26T01:06:04+5:30
अपुरा पाऊस व वाढते तापमान यामुळे वातावरणात बदल झाल्याने हिवताप व डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तुमसर शहरात रक्त तपासणी दरम्यान रोज दहा ते पंधरा डेंग्यूचे रुग्ण आढळले. सध्या शासकीय व खाजगी रुग्णालयात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

डेंग्यू, हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अपुरा पाऊस व वाढते तापमान यामुळे वातावरणात बदल झाल्याने हिवताप व डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तुमसर शहरात रक्त तपासणी दरम्यान रोज दहा ते पंधरा डेंग्यूचे रुग्ण आढळले. सध्या शासकीय व खाजगी रुग्णालयात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गत २० दिवसांपासून साथीच्या आजाराने डोके वर काढले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या डेंग्यू ू, मलेरिया, व्हायरल तापाने तुमसर शहर व तालुक्यात अनेक रुग्ण त्रस्त आहेत. लहान मुलांना देखील व्हायरल सर्दी, ताप, खोकला यानी त्रस्त असल्याने आरोग्य विभागाकडून वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे. वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावले असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दररोज रक्ततपासणी केंद्रासह शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पावसाळा सुरु होऊन अनेक दिवस झाले तरी नियमित पाऊस न पडल्याने आज ही अनेक घरात कुलर सुरु आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे पाण्यात साचलेल्या डासांची मोठ्या प्रमाणत उत्पत्ती होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आजाराची धास्ती घेतलेली आहे. सध्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात तापाच्या रुग्णांची लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण ही तापाचे असल्याने डॉक्टर रुग्णांना रक्त तपासणीचा सल्ला देत आहेत. त्यामुळे खाजगी रक्त तपासणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना योग्य मार्गदर्शन करुन डेंग्यू, मलेरिया व तापाबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्याने आरोग्य विभागाने त्वरित उपाय योजना करण्याची गरज आहे.