केसलवाड्यात पुन्हा डेंग्यूचा उद्रेक
By Admin | Updated: July 8, 2014 23:17 IST2014-07-08T23:17:21+5:302014-07-08T23:17:21+5:30
केसलवाडा येथे महिन्याभरानंतर पुन्हा डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. १७ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात भरती असून गावातही रुग्णांची संख्या बरीच आहे. डेंग्यू सदृष्य आजाराने निशा मनिराम अहिरकर

केसलवाड्यात पुन्हा डेंग्यूचा उद्रेक
करडी पालोरा : केसलवाडा येथे महिन्याभरानंतर पुन्हा डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. १७ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात भरती असून गावातही रुग्णांची संख्या बरीच आहे. डेंग्यू सदृष्य आजाराने निशा मनिराम अहिरकर (२०) या मुलीचा हकनाक जीव गेल्यानंतर प्रशासनात खळबळ माजली. जि.प. सदस्य महेंद्र शेंडे यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरल्यानंतर गावात कॅम्प लावले गेले.
केसलवाडा महिन्याभरापूर्वी डेंग्यूचा उद्रेक जाणवला होता. त्यावेळी आरोग्य विभागाने कॅम्प लावून लोकांच्या आरोग्याची तपासणी केली होती. फॉगींग मशीनने धुळ फवारणी केली होती. ग्राम प्रशासनाने सुद्धा गावातील नाल्यांच्या साफसफाईचे काम पूर्ण केले होते. मात्र महिन्याभरानंतर पुन्हा एकदा डेंग्यूचा प्रकोप गावात जाणवत आहे. गावातील लहान मुलांपासून वृद्धापर्यंत अनेक जण आजारी आहेत.
डेंग्यू सदृष्य आजाराने निशा मनीराम अहिरकर (२०) या मुलीचा काल रात्री ९.३० वाजताचे सुमारास डॉ.व्यास भंडारा यांच्या रुग्णालयात मृत्यू झाला. गावातील नागरिक आजाराने काळजीत आहेत. विविध खासगी रुग्णालयात नागरिक भरती आहेत. त्यामध्ये अमोल गंगाधर मेश्राम (१४), निहान सोविंदा मेश्राम (८), विशाल ग्यानीराम मेश्राम (१०), निलेश पांडूरंग शेंडे (२१), रोहित रमेश उईके (१०), आरती नामदेव गजबे (१९), रमेश चिंतामण नेवारे (३०), श्रद्धा भिवा मेश्राम (६), भगवान कोदू नेवारे (५९), तेजस अशोक साठवणे (३), प्रणय गौरीशंकर देवगडे (६),, मंगला गौरीशंकर देवगडे (२८), ईश्वर सूर्यभान शेंदरे (२३), शांता बबन नेवारे (५५), दुर्गा प्रदीप नेवारे (२१) यांचा समावेश आहे. स्नेहल सुशील कोहळे (४), शीतल दयाराम कोहळे (१३) यांना नुकतेच तुमसर येथील एका खासगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तुमसर, भंडारा व तुमसर येथील खासगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. गावात मोठ्या प्रमाणात आजारी रुग्ण असतानाही आरोग्य विभाग झोपेत होते. निशा अहिरकरचा मृत्यू होताच जि.प. सदस्य महेंद्र शेंडे यांनी गावाला भेटी देऊन नागरिकांची विचारपूस केली. तेव्हा त्यांना आरोग्याच्या प्रश्नाबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांनी सांगितली. जि.प. सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरताच गावात डॉ.झोडे, डॉ.डोंगरवार यांच्या नेतृत्वात आरोग्य शिबिर लावण्यात आले. गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु आहे. आरोग्याच्या काळजी संबंधी गावकऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी बनोटे, आळे, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ.कापगते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.चिंधालोरे, पंचायत विस्तार अधिकारी कुंभरे यांनी गावाला भेटी देऊन नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. फॉगींग मशीनने पुन्हा गावात धुळ फवारणी करण्यात येणार आहे.
पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या
केसलवाडा गावात आरोग्य प्रश्नाबरोबर पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. गावातील एकमेव गोड्या पाण्याची विहीर कोरडी पडली आहे. विहिर शेजारील शेतात दोन बाजूला दोन बोअरवेल्स खोदल्या गेल्या असून मोठ्या प्रमाणात दोन्ही बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा होत असल्याने कधी न कोरडी पडणारी विहिर कोरडी पडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन्ही बोअरवेल्सवर बंदी आणण्याची मागणी आहे. अशोक साठवणे यांच्या चौकातील विहिरही कोरडी पडली असून सार्वजनिक बोअरवेल्सही भूजलपातळी खोलात गेल्याने कमकुवत ठरत आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. गावातील अन्य ठिकाणचे पाणी दूषित असून खारट व पिण्यायोग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असून रात्री बेरात्री बाहेरून पाणी आणावे लागत आहे. शासन शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी विविध योजना राबवित असला तरी ७५० लोकसंख्येच्या गावासाठी प्रशासनाकडून गावासाठी योजना राबविल्या जात नसल्याचा आरोप आहे. तत्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)