विना सिग्नलने धावते डेमो ट्रेन
By Admin | Updated: April 19, 2016 00:27 IST2016-04-19T00:27:09+5:302016-04-19T00:27:09+5:30
विना प्लॅटफॉर्म व विना सिग्नल प्रणालीने सायडींगवरुनच पहाटेची तुमसर रोड- तिरोडी प्रवाशी डेमो मागील आठ दिवसापासून सुटत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे.

विना सिग्नलने धावते डेमो ट्रेन
सायडिंगवरुन सुटते : प्रवाशांचा जीव धोक्यात, सुविधांचा अभाव
मोहन भोयर तुमसर
विना प्लॅटफॉर्म व विना सिग्नल प्रणालीने सायडींगवरुनच पहाटेची तुमसर रोड- तिरोडी प्रवाशी डेमो मागील आठ दिवसापासून सुटत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. सायडींगवर प्लॅटफॉर्म नाही, वीज नाही. समतल जागा नाही अंधारातून मार्गक्रमण करुन जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांना गाडीत बसावे लागत आहे. नियम सांगणाऱ्या रेल्वे प्रशासनाला येथे नियमांचा विसर पडला आहे.
जागतिक दर्ज्याच्या सुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासन मागील आठ दिवसापासून तुमसर रोड रेल्वे स्थानकाशेजारी सायडींगवरुन पहाटे ४.१५ वाजता प्रवाशी रेल्वे गाडी सोडत आहे. सायडींगला सिग्नल प्रणाली नाही. विना सिग्नल प्रणालीने प्रवाशी गाडी सोडण्यात येत आहे.
सायडींगवर प्लॅटफार्म नाही, अंधाराचे साम्राज्य असते, साधा वीजपुरवठा येथे केला नाही. सायडींगची जागा समतल करण्यात आलेली नाही. मुख्य प्लॅटफार्मवरुन सायडींगकडे अंधारातच मार्ग तुडवत जावे लागते. सायडींगच्या बाजूला झुडपे आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांचा येथे धोका आहे. हातात सामान घेवून लहान मुले, वृध्द नागरिक महिलांना जीव धोक्यात घालून गाडीत बसावे लागत आहे.
तुमसर (रोड) देव्हाडी - तिरोडी रेल्वे मार्ग हा ब्रिटिशकालीन आहे. या मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तिकीट काढून नियमानुसार प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे करावा लागत आहे.
आॅटो सिग्नल प्रणालीचा फटका बसत असल्याची येथे माहिती आहे. सायडींगवरुन डेमो प्रवासी गाडी न घेता ती प्लॅटफॉर्म क्रमाक एकवरुन घेण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने हा अफलातून निर्णय का घेतला हे एक कोडे आहे. निदान सायडिंग सतल करणे, वीजपुरवठा सुरु करण्याची येथे गरज होती.
नागपूर येथील रेल्वे मुख्यालयाच्या निर्णयानुसार केवळ पहाटेची डेमो प्रवाशी गाडी सोडण्यात येत आहे. सायडींग समतल करणे, वीजपुरवठा करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. आॅटो सिग्नल या तांत्रिक बाबीमुळेच सायडींगवरुन गाडी सोडण्यात येत आहे. एकच ट्रॅक असल्याने विना सिग्नलची कोणतीच बाब नाही.
- सुरेंद्र सिंह,
प्रभारी रेल्वे अधीक्षक,
तुमसर रोड रेल्वे स्थानक