अंधश्रध्देचे भूत मानगुटीवर, गोरबडे कुटुंबाची वाताहत
By Admin | Updated: October 14, 2014 23:14 IST2014-10-14T23:14:00+5:302014-10-14T23:14:00+5:30
जादुटोणाविरोधी कायदा असतानाही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील एका कुटूंबावर गाव सोडून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे. 'ते' कुटूंब सध्या भयभीत झाले असून नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले आहेत.

अंधश्रध्देचे भूत मानगुटीवर, गोरबडे कुटुंबाची वाताहत
तुमसर : जादुटोणाविरोधी कायदा असतानाही तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील एका कुटूंबावर गाव सोडून जाण्याचा प्रसंग ओढवला आहे. 'ते' कुटूंब सध्या भयभीत झाले असून नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले आहेत. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे.
तुमसर तालुका मुख्यालयापासनू पाच किमी अंतरावरील मिटेवानी येथील संजय गोरबडे यांच्या कुटूंबावर हा प्रसंग ओढवला आहे. जेमतेम तीन हजार लोकसंख्येच्या गावात संजय गोरबडे हे कुटूंबासह शेती व मजुरी करून उदरनिर्वाह भागवितात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका कुटूंबातील युवती आजारी आहे. आजारपणात ती संजय गोरबडे यांच्या नावाने बडबडत असते. त्यामुळे संजयनेच मुलीवर जादुटोणा केल्याचा आरोप युवतीच्या कुटूंबीयांनी करून वाद घातला. अंधश्रध्देने पछाडलेल्या 'त्या' कुटूंबातील व्यक्तींना गावातील नागरिक व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर गोरबडे यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मानगुटीवर अंधश्रध्देचे भूत बसून असल्याने त्यांनी संजयवरच आक्षेप घेतला.
काहींनी युवतीच्या वडिलांना समजावून तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याचे सुचविले. युवतीला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचार अर्ध्यावर सोडून युवतीला परत गावाला घेऊन गेले. पुन्हा त्या युवतीने बडबडून संजय यांचे नाव घेणे सुरू केले. त्यामुळे संजय गोरबडे यांच्या कुटूंबीयांप्रती असंतोष पसरला. यामुळे संजयने कुटूंबासह गाव सोडले. अंधश्रध्देमुळे राहते घर सोडून जावे लागल्याने संजयला हसारा येथील नातेवाईकाकडे आश्रय घ्यावा लागला आहे. सदर आशयाचे वृत लोकमतमध्ये आज मंगळवारला प्रकाशित झाले. त्यात अनावधानाने संजय गोरबडे यांच्याऐवजी शंकर गोरबडे यांचे नाव प्रकाशित झाले होते. राज्य शासनाने अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा कठोर करून दंडाची शिक्षेची तरतुद केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे निर्देश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहे. मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)