वेतन पथक अधीक्षकांच्या स्थानांतरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:22+5:302021-04-01T04:35:22+5:30
भंडारा : भंडारा वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांचे स्थानांतरण करा व अन्य मागण्यांसाठी ...

वेतन पथक अधीक्षकांच्या स्थानांतरणाची मागणी
भंडारा : भंडारा वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांचे स्थानांतरण करा व अन्य मागण्यांसाठी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हा परिषद समोर ५ एप्रिल रोजी धरणे देण्यात येणार आहे. या आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने पाठिंबा दर्शविला आहे.
भंडारा वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या कार्यालयात जाणाऱ्यांना अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांची वागणूक सौजन्याची नसते. अरेरावी सुध्दा करून अपमानजनक बोलतात.
मुख्याध्यापकांना कमी लेखण्यात येते. मोबाईलवरही नीट बोलत नाही. भंडारा वेतन पथकाचे कार्यभार घेतला तेव्हापासून त्यांची मनमानी सुरू आहे. नियमित वेतनात क्षुल्लक त्रुटी काढल्या जातात. "तुमचे काम केले आहे. भंडारा वेतन पथकात या " असे बोलून मुख्याध्यापकांना मानसिक त्रास देण्याची मजल त्या महिला अधीक्षक यांची गेली आहे.
लहान- सहान काम करण्यासाठी आर्थिक देवाण- घेवाण करीत असतात. अधिकाऱ्यांच्या बोलण्याला किंमत देत नाही. अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांच्या वागणुकीबाबत तत्कालीन व विद्यमान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना अवगत करून देण्यात आले आहे. आपल्याच तोऱ्यात वागणाऱ्या व मुख्याध्यापक ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची हेटाळणी करणाऱ्या भंडारा वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांचे तातडीने स्थानांतरण करण्याची मागणी करणारे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लिकर यांना सादर करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी यांनी त्यांचा बदलीचा प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे सादर करावा, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शाळांना मंडळ मान्यता किमान पाच वर्षाची देण्यात यावी, अशी शिफारस शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी. कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्याने शाळांची तपासणी शिथिल करण्यात यावी. शाळेची मान्यता वर्धित पाच वर्षाची करण्यात यावी. वेतन बिलाचे स्पॉट चेकिंग करण्यात यावे. एक तारखेला वेतन करण्यात यावे. सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरणाचे लाभ देण्यात यावे. शाळेतील रिक्त पदे भरण्याची परवानगी देण्यात यावी. वेतनेत्तर अनुदान व शाळा इमारत भाडे शासकीय दराने देण्यात यावे. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांस कोविड-१९ लस देण्यात यावी. वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ देण्यात यावे. या विषयावर शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर यांच्यासोबत जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव राजू बांते, उपाध्यक्ष प्रमोद धार्मिक, दामोदर काळे, आर्चना बावणे, राजू भोयर, विलास जगनाडे आदींनी निवेदन देताना चर्चा केली.
वरिष्ठ व निवड श्रेणीचे एकही प्रस्ताव शिल्लक नाहीत. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांस कोविड-१९ लस देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे विषय मांडला गेला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरणाचे लाभ दिले जाईल. अनुदान नसल्याने प्रकरण थांबविण्यात आले आहेत. तसेच वेतन पथकाच्या अधीक्षकांच्या बाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. वेतन पथकाच्या अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांच्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास ५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद भंडारा समोर धरणे दिले जाणार आहे.
बॉक्स
विमाशिचा जाहीर पाठिंबा
वेतन पथक अधीक्षक शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या अनागोंदी, बेबंदशाही कारभारा विरोधात तसेच इतर मागण्या संदर्भात भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने ५ एप्रिल २०२१ ला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्या आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ भंडारातर्फे जाहीर सक्रिय पाठिंबा देत असल्याचे विमाशिचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख , जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी जाहीर केले आहे.