उन्हाळी धान खरेदी करण्याची मागणी
By Admin | Updated: May 10, 2015 00:53 IST2015-05-10T00:53:33+5:302015-05-10T00:53:33+5:30
पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात उन्हाळी धान पिक निघणे सुरु झाले असून या धानाला व्यापारी कवडीमोल भावामध्ये मागत आहेत.

उन्हाळी धान खरेदी करण्याची मागणी
कोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात उन्हाळी धान पिक निघणे सुरु झाले असून या धानाला व्यापारी कवडीमोल भावामध्ये मागत आहेत. तेव्हा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रसुरु करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.
सध्या धान उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. युती सरकारने मोठे आश्वासन दिले ते पाळले नाही. त्यामुळे धान मातीमोल किंमतीत विकावा लागत आहे. खरीप हंगामातील धान भाव नसल्याने शेतकऱ्यांनी भरुन ठेवले आहेत. आता उन्हाळी धान निघाले आहे. अशावेळी धान खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे. जून महिण्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत धान खरेदी सुरु ठेवणे आवश्यक आहे. अनेक व्यापाऱ्यानी खरीप हंगामातील धान शेतकऱ्यांचे खरेदी केले. नंतर धानाचे भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला. अजूनही अनेक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे व्यापाऱ्यानी दिले नाही. तर काही व्यापारी शेतकऱ्यांना आपले धान परत नेण्याचा तगादा लावीत आहेत.
पुढील महिन्यात शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात करणार आहे. तेव्हा त्यांच्याकडे मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी आवश्यक पैसा असणे गरजेचे आहे. धानाचे भाव पडल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहे. उन्हाळी धानसाठी शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)