शिक्षकांना पदस्थापना करण्याची मागणी
By Admin | Updated: May 21, 2016 00:41 IST2016-05-21T00:41:06+5:302016-05-21T00:41:06+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुमारे १७४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मागील आठ वर्षापासून जिल्हा परिषद ....

शिक्षकांना पदस्थापना करण्याची मागणी
आदिवासी शिक्षकावर अन्याय : आदिवासी संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार
तुमसर : जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुमारे १७४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मागील आठ वर्षापासून जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांना भूलथापा देत आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागेवर आंतरजिल्हा बदलीने अनुसूचित जमाती शिक्षकांना पदस्थापना करण्याची मागणी आदिवासी संघटनेने मुख्यमंत्री, राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडे केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील अनेक शिक्षक मागील १० ते २० वर्षापासून जिल्ह्याबाहेर सुमारे ९०० ते १,३०० कि़मी. दूर अंतरावर सेवा बजावत आहेत. मागील आठ वर्षापासून हे शिक्षक जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवित आहेत.
भंडारा जिल्ह्यात सध्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक ३६, विषय शिक्षक ९९, केंद्र प्रमुख ११, प्राथमिक शिक्षक ३८ पदे रिक्त आहेत. यात अनुसूचित जमातीचे प्रवर्गाचे २० ते २५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाने अजुनपर्यंत शिक्षकांची रिक्त पदे भरली नाही. भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. पूर्व विदर्भात कुणी नोकरी करायला येण्यास तयार नाही. उलट जिल्ह्यातील शिक्षक शेकडो किलोमीटर दूर कर्तव्य बजावित आहेत. ते शिक्षक गृह जिल्ह्यात येण्यास तयार असतानी शासन व प्रशासन त्यांना येऊ देत नाही, ही खरी शोकांतीका आहे.
वर्ग १ ते ५ व ६ ते ८ चा शैक्षणिक दर्जा अत्यंत चिंताजनक आहे. शिक्षणाविना शाळा कशा सुरू असतील याचा विचारच न केलेला बरा. भंडारा जिल्ह्यात २६ टक्के आदिवासी समाज आहे. आंतरजिल्हा बदलीने येणारे शिक्षक एकूण १० त्यापैकी २ शिक्षकांचे समायोजन झाले आहे. उर्वरित ८ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने येणारे आहेत. मागील अनेक वर्षापासून निवेदन देवून सुद्धा अनुसूचित जमाती शिक्षकांना रिक्त जागेवर पदस्थापना देण्यात आली नाही.
नवीन सत्रात बदली ग्रस्त शिक्षक धनराज इळपाचे, संजय सिरसाम, ओमन सातवान, सुरेखा धुर्वे, रूपाली वरखडे, सुनिल बारेकर, सोपचंद सिरसाम, रोशनी मडावी, विणा कोडवते यांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली अहे.
शिष्टमंडळात आदिवासी आघाडीचे अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, नरेंद्र मडावी, जयदेव इनवाते, आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनेश मरस्कोल्हे, सचिव विजय नैताम, प्रविण उईके, कैलास गजाम, विकास मरस्कोल्हे, सुभाष धुर्वे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)