मांग-गारुडी समाज दाखल्यांपासून वंचित
By Admin | Updated: December 15, 2014 22:51 IST2014-12-15T22:51:32+5:302014-12-15T22:51:32+5:30
तालुक्यातील गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

मांग-गारुडी समाज दाखल्यांपासून वंचित
भंडारा : तालुक्यातील गिरोला येथील वडार समाजाला व कारधा येथील मांग गारुडी समाजाला तत्काळ जातीचे दाखले देण्यात यावे अशी मागणी आदिवासी पारधी समाज परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीला घेऊन आज त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले. मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गिरोला येथील वडार समाजाचे यशवंतराव चव्हाण वसाहतीअंतर्गत पुनर्वसन करण्यात यावे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परिणामी पुनर्वसनाची प्रक्रियाही सुरु करण्यात आली. मात्र पुनर्वसनासाठी जातीच्या दाखल्याची गरज होती. जातीच्या दाखल्यासाठी वडार समाजाला व मांग गारुडी समाजाला सन १९६१ चा महाराष्ट्रातील वास्तव्याचा पुरावा मागितला जात आहे. मात्र हा समाज भटक्या विमुक्त समाजात मोडत असल्यामुळे ते कधीच एका ठिकाणी राहत नाहीत.
गावात गेले तर घर नाही, रानात आले तर हातभर जमीन नाही. अशा स्थितीत त्यांनी वास्तव्याचा पुरावा आणावा तरी कुठून अशी स्थिती या समाजाची झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे लोटले तरीही या समाजाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व अन्य संवैधानिक गरजांपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र शासनाने केले आहेत.
भंडारा जिल्ह्यात वडार, मांग गारुडी, पारधी अशा अनेक जाती शासनाच्या विकासात्मक धोरणापासून दूर आहेत. राजकीय इच्छाशक्तीअभावी या समाजाची प्रगती होऊ शकली नाही. परिणामी या समाजाला वेळोवेळी आंंदोलन करण्याची वेळ आली आहे.
शासन निर्णयाप्रमाणे २००८ व २०१२ प्रमाणे वडार व मांग गारुडी समाजाला कोणत्याही अटी न घालता जातीचे दाखले देण्यात यावे, गिरोला येथील वडार समाजाच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत पुन:वर्सन करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशाराही फाउंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)