क्रीडा संकुलात सुविधा देण्याची मागणी
By Admin | Updated: July 5, 2015 00:37 IST2015-07-05T00:37:05+5:302015-07-05T00:37:05+5:30
जिल्ह्याच्या मुख्यालयात सर्वात मोठे क्रीडांगण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल.

क्रीडा संकुलात सुविधा देण्याची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दिवे, पाण्याची गरज
भंडारा : जिल्ह्याच्या मुख्यालयात सर्वात मोठे क्रीडांगण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल. परंतु या क्रीडा संकुलाची निधी अभावी व शासनाच्या उदासीन धोरणामुळे अत्यंत दैनावस्था झाली आहे. मुलभुत सुविधांच्या अभावामुळे हे क्रीडांगण आहे की काय? असे बोल संकुलाकडे पाहिल्यावर येते. याबाबत क्रीडा प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
संपुर्ण भंडारा जिल्ह्यात आबालवृध्द खेळाडू व शारीरिक विकासाकरिता शिवाजी क्रीडा संकूल भंडारा ही एकमेव वास्तु आहे. पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत विविध खेळाडू इथे खेळ, सराव व व्यायामाकरिता येतात. पंरतु क्रीडांगणात सर्व क्रीडा प्रकारानुरुप कोणतीही अत्याधुनिक सुविधा नसल्याने खेळाडूंची कुंचबना होत आहे. राज्यस्तरावरील ‘अ’ दर्जाच्या सर्व क्रीडा सोयींनीयुक्त असा क्रीडा संकुलाचा विकास व्हावा, सर्व प्रकारचे प्रशिक्षक व मैदाने तथा साहित्य उपलब्ध करण्यात यावे. सर्व सुविधा वापरासंबंधी नियमावली व जाहीर सुचना फलक लावण्यात यावा. तथा खेळाडूंना सराव तथा प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात यावे, अशी मागणी आहे.
सामान्य नागरी खेळाडुंसाठी नेहमी वापरासाठी खास वाकींग ट्रॅक, रनींग ट्रॅक, प्रेक्षकांसाठी सीटींग ट्रॅक, खुर्चीची सोय व्हावी, महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे प्रसाधन गृहाची निर्मिती व्हावी, तसेच योग, प्राणायाम, आसणे आदीची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आहे. तसेच अत्याधुनिक लायटींग सुविधा, वाहन पार्कींग सुविधा, शुध्द पिण्याच्या पाण्याची बाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंसाठी लॉजींग, बोर्डींग सुविधा उपलब्ध करण्यात यावी. राष्ट्रीय खेळ धोरण, उपक्रम जाहीर करावे. स्टेडीयम बाहेरील अतिक्रमण काढुन व्यापारी गाळे बनविण्यात यावे, त्यातुन येणारा निधी खेळ विकासात वापरण्यात यावे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात अविनाश गायधने, विनोद पेशने, धनंजय खापर्डे, उमेश भरणे, नामदेव गिऱ्हेपुंजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)