बीडीओला अटक करण्याची मागणी
By Admin | Updated: December 6, 2014 01:01 IST2014-12-06T01:01:20+5:302014-12-06T01:01:20+5:30
लाखांदूरचे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांनी बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी आता त्यांना अटक करण्याची मागणी एसटी कामगार काँग्रेसने केली आहे.

बीडीओला अटक करण्याची मागणी
साकोली : लाखांदूरचे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांनी बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी आता त्यांना अटक करण्याची मागणी एसटी कामगार काँग्रेसने केली आहे.
माझे वाहनाला धक्का मारलास, असे बोलून झिंगरे यांनी त्या चालकाला ओढतान केली, त्यात शर्ट फाडले व हाताने मारहाण केली. शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर नुकसान भरपाई म्हणून एक हजार रुपये मागून बिडीओ निघून गेल्याचे तक्रारीत एसटी चालकाने म्हटले आहे.
एसटीचे चालक हेमराज वाघाये (५४) रा. केसलवाडा (वाघ) हे भंडारा परिवहन विभागाच्या साकोली आगारात कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन साकोली पोलिसांनी लाखांदुरचे खंडविकास अधिकारी विजय झिंंगरे यांच्याविरुध्द भादंवि ३५३, ३३२, १८६ कलमान्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
अटक न झाल्यास मोर्चा
याप्रकरणी साकोली पोलिसांनी खंडविकास अधिकारी झिंगरे यांचेवर गुन्हा दाखल करुन अटक न केल्यास एसटीचे सर्व कर्मचारी पोलिस ठाण्यावर मोर्चा आणतील, असा ईशारा एस.टी. कामगार काँग्रेस भंडाराचे विभागीय सचिव भगीरथ धोटे यानी दिला आहे.
तक्रार खोटी - बिडीओ विजय झिंगरे
मी लाखांदूरहून साकोलीकडे येत असतांना बस चालकाने माझ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यात माझ्या कारला एस.टी.चा जोरदार धक्का लागला. यात माझ्या कारचे नुकसान झाले. पुढे सावरबंधच्या बसस्थानकजवळ बस थांबवून मी बसचालकाला घडलेला प्रकार सांगितला. मात्र मी बसचालकाला मारहाण केली नाही व कपडेही फाडले नाही. त्यांनी दिलेली तक्रार खोटी असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)