३५ वर्षांपासून देवरी तलाव कोरडा
By Admin | Updated: August 31, 2016 00:24 IST2016-08-31T00:24:29+5:302016-08-31T00:24:29+5:30
परिसरातील शेती हरितक्रांती करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवरी (देव) तलाव रोजगार हमीतून तयार करण्यात आला.

३५ वर्षांपासून देवरी तलाव कोरडा
पुनरूज्जीवनाची गरज : जलयुक्त शिवारातून वगळले, हरितक्रांतीचे स्वप्न कोसोदूर
मुखरु बागडे पालांदूर
परिसरातील शेती हरितक्रांती करण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी देवरी (देव) तलाव रोजगार हमीतून तयार करण्यात आला. १०० हेक्टरमध्ये तलावाची व्याप्ती आहे. मात्र शासनाच्या दप्तरदिरंगाईने आजही तलाव बादलीभर पाण्याकरिता आसुसलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तलावाचे पुनरूज्जीवन करण्याची गरज आहे.
मागील दहा वर्षांपासून सातत्याने तलाव दुरुस्तीकरिता शासनदरबारी पाठपुरावा करीत असून प्रशासनाच्या सुस्त व वेळकाढू धोरणाने तलावाला न्याय मिळालेला नाही. जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत प्रस्तावित यादी तपासून देवरी तलावाला न्याय दिल्यास परिसरात हरितक्रांती घडण्यास मदत होईल. देवरी (गोंदी) हे गाव जलसिंचन शिवार योजनेत घेतले आहे. याकरिता सुमारे ७० लाखांचा निधी अपेक्षित असून शासनस्तरावर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या मदतीने प्रकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे.
लाखोंचा खर्च केल्यानंतरही नागरिकांना शेतीकरिता पाण्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे यात मोठी अफरातफर झाल्याचे वरपांगी दिसून येत असतानाही कोणीही साधा ब्र काढलेला नाही. तलावाचे पुनरूज्जीवन झाल्यास परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमिन ओलीताखाली येईल. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनसुविधा उपलब्ध होईल. २००५ ला अतिवृष्टीने मुख्य गेटवर दबाव पडल्याने किंवा ऊन, वारा, पावसाने परिणाम होऊन मुख्य गेटवर तडे गेले. पाळ फुटली. तलावाचे पाणी शेतात घुसले. शेतकऱ्यांची मच्छीमारांची सुमार नुकसान झाले. या गावातील ढिवर समाजाला मिळणारा हक्काचा रोजगार हातून गेला.
सिंचनाची आशा झाली धूसर
१९७५ साली रोजगार हमी योजनेतून सुमारे ३० लाख रूपयांचा निधी खर्च करून १०० हेक्टर परिसरात तलावाचे बांधकाम करण्यात आले. तलावाचे म्हणजे नहराचे पाळीचे काम पूर्ण होऊन सिंचन होणार अशी आशा तत्कालीन अभियंत्यांनी शेतकऱ्यांना दाखविली. मात्र आजही आशेची निराशाच दिसत आहे. तलावाच्या दारांच्या चुकीच्या बनावटीमुळे शेतकरी सिंचनापासून मुकला. तलाव निर्मितीला ३५ वर्ष लोटूनही शासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
देवरी तलावावर शासनाने लाखोंचा खर्च केलेला आहे. मात्र तलावाचे काम बंद पडले. तलावाचे पुनरूज्जीवन केल्यास परिसरातील शेतकऱ्यांना हरितक्रांतीकरिता सहकार्य होईल. यातून त्यांचे जीवनमान उंचावेल.
- भरत खंडाईत
माजी जिल्हा परिषद सदस्य.