साकोलीत अधिकाऱ्यांचे निवासस्थान शोभेची वास्तू
By Admin | Updated: March 6, 2016 00:20 IST2016-03-06T00:20:48+5:302016-03-06T00:20:48+5:30
येथील अधिकाऱ्यासह पदाधिकाऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे.

साकोलीत अधिकाऱ्यांचे निवासस्थान शोभेची वास्तू
संजय साठवणे साकोली
येथील अधिकाऱ्यासह पदाधिकाऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे. लाखांदूर रोडवरील खंडविकास अधिकारी यांचे निवासस्थान तर बाजार चौकातील सभापती यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान सध्या सार्वजनिक शौचालय बनले आहेत. त्यामुळे खंडविकास अधिकारी व सभापती यांना भाड्याच्या घरात रहावे लागते.
साकोली हे नक्षल प्रभावित क्षेत्रात मोडत असल्याने शासनाने येथील शासकीय कार्यालये व शासकीय सदनिका याची देखभाल व दुरूस्तीवर विशेष लक्ष देणे गरजेचे असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या येथील कार्यालये व सदनीका दुर्लक्षित आहेत. मागील पाच वर्षापुर्वी लाखांदूर रोडवरील खंडविकास अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानकाला अचानक आग लागली.
त्या आगीत ही सदनिका पूर्णपणे जळून राख झाली. फक्त विटा मातीच्या भिंती उभ्या आहेत. मात्र त्यानंतर या इमारतीच्या दुरूस्तीकडे वा नवीन बांधकामाकडे लक्षच देण्यात आले नाही.
बाजार चौकात सभापती भवन तयार करण्यात आले होते. मात्र मागील १० वर्षापुर्वी या सभापती भवनाला एकही ग्रहण लागले व ही भवन आता बाजारातील शौचालय झाले आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सदनिकाकडे दुर्लक्ष
जिल्ह्यातील जुना उपविभाग म्हणूनही साकोली तालुक्याची ओळख आहे. मात्र येथील अधिकाऱ्यासाठी व कर्मचाऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या सदनिकांची अवस्था गंभीर असून त्या राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे घरभाड्यापोटी शासनाला महिन्याकाठी हजारो रूपये खर्च द्यावा लागतो.
बांधकामासाठी निधीची बोंबाबोंब
साकोली येथे तहसिल कार्यालयाच्या बांधकामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन बांधकामही सुरू झाले. मात्र त्यापुर्वी पासून सदनिका खराब आहेत. मात्र त्यांच्या दुरूस्तीसाठी व नवीन बांधकामासाठी निधीची बोंबाबोंब आहे. त्यामुळे शासन दुजाभाव करीत आहे, असा अधिकाऱ्यांची बोंब आहे.