साकोली लाखनी, लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 01:25 IST2016-03-02T01:25:47+5:302016-03-02T01:25:47+5:30
खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या निकषावरून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली.

साकोली लाखनी, लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : साकोलीत देणार धरणे
साकोली : खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या निकषावरून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. मात्र नंतर ती गावे पुन्हा रद्द करण्यात आली. त्यामुळे शासनाने फेरविचार करून साकोली लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शासकीय मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे राज्य शासनाने बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. यात दोन हजार कोटी रुपये बाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यातील एकुण दुष्काळग्रस्त गावापैकी भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या दृष्टीकोणातून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. या गावातील शेतकऱ्यांना शासकीय निर्देशानुसार काही दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली होती.
खरीप हंगामा अंतर्गत अवर्षणामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्हा वगळला. परिणामी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या ३७१ गावातील शेतकरी मदतीविना राहणार आाहेत.
कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुलतानी संकटाला बळी पडावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत लोटल्याशिवाय जातील. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करायला लागतील.
हे टाळण्यासाठी जाहीर झालेली निधी तत्काळ शेतकऱ्यांना पुरविण्याची व्यवस्था शासनाने करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दि. ३ मार्चला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील असा इशाराही पत्रपरिषदेतून देण्यात आला आहे. या आशयाचे निवेदन साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांना देण्यात आले.
या पत्रपरिषदेला अविनाश ब्राह्मणकर, डॉ.विकास गभणे, प्रदीप मासूरकर, अंगराज समरीत, नरेंद्र वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे, राशीद कुरैशी, डॉ.विनायक मेंढे, राकेश भारकर, मदन रामटेके, दिपक चिमणकर, चंद्रकांत सारंगापुरे, होमराज कापगते, एल.टी. भावे, हेमंत भारद्वाज, बाळा बोरकर उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)