‘त्या’ निर्णयाने होमगार्डवर उपासमारीचे संकट ओढावणार
By Admin | Updated: August 6, 2016 00:31 IST2016-08-06T00:31:02+5:302016-08-06T00:31:02+5:30
ज्या होमगार्डची पुनरनियुक्तीची तारीख १२ जुलै आणि येणाऱ्या होमगार्डसची पुनरनियुक्ती थांबविण्यात आली आहे,

‘त्या’ निर्णयाने होमगार्डवर उपासमारीचे संकट ओढावणार
प्रकरण फेरनोंदणीचे : सामूहिक आत्मदहनाचा दिला इशारा
साकोली : ज्या होमगार्डची पुनरनियुक्तीची तारीख १२ जुलै आणि येणाऱ्या होमगार्डसची पुनरनियुक्ती थांबविण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर होमगार्ड सैनिक सेवेतून कमी होणार आहेत. त्यामुळे होमगार्डवर कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ १५ आॅगस्टला सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा होमगार्डस संघटनेने दिला आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
गृहरक्षक दलाचे सैनिक हे राज्य शासनाच्या आदेशानुसार कर्तव्य पार पाडत असतात. उपमहासमादेशकांनी २३ जूनच्या पत्रानुसार होमगार्डमध्ये १२ वर्षे सेवा केलेल्या सैनिकांना कमी करण्यात येणार आहे. याबाबत होमगार्ड सैनिकांनी हक्कासाठी न्याय मागणी केली असता त्या पत्राला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ज्यांची पुनरनियुक्ती १२ जुलै रोजी संपुष्ठात आली त्यांना पुनरनियुक्ती देण्यात यावी, ज्याप्रमाणे अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत १० टक्के आरक्षण व वयोमर्यादेत ४६ वर्षापर्यंत सवलत देण्यात आली. त्याच धर्तीवर ३ वर्षे सेवा केलेल्या होमगार्डनासुद्धा सवलत देण्यात यावी, दर ३ वर्षानंतर होमगार्डच्या पुनरनोंदणीचे प्रयोजन रद्द करण्यात यावे, होमगार्ड नवीन नोंदणी भरती प्रक्रीया कार्यक्रम कायमचे बंद करण्यात यावे, १२ वर्षानंतर सेवा समाप्त करणारा महासमादेशकांनी निर्गमित केलेली परिपत्रके रद्द करण्यात यावी, होमगार्डसना ३६५ दिवसाचा बंदोबस्त देण्यात यावे, होमगार्डसना भत्ते व सुविधा देण्यात याव्या, पोलीस प्रशासनातील रिक्त पदे शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे भरण्यात यावे, अशा मागण्या आहेत. मान्य न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल व याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची राहील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी )