देव्हाडीतील उड्डाणपूल पोचमार्ग झाला ‘डेंजर झोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:31 IST2019-01-15T21:31:35+5:302019-01-15T21:31:59+5:30
गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुल पोचमार्ग खड्डेमय झाला असून या मार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.

देव्हाडीतील उड्डाणपूल पोचमार्ग झाला ‘डेंजर झोन’
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गोंदिया मार्गावरील देव्हाडी उड्डाणपुल पोचमार्ग खड्डेमय झाला असून या मार्गावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची निविदा निघाली असून किमान तीन महिने या कामाला लागणार असल्याने हा रस्ता डेंजर झोन झाला आहे.
तुमसर येथील देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्गाच्या नूतनीकरणाची निविदा दुसऱ्यांदा प्रकाशित करण्यात आली. पहिली निविदा ५ डिसेंबर २०१८ रोजी तर दुसरी निविदा २ जानेवारी रोजी जागतिक बँक प्रकल्प यांनी प्रकाशित केली. १ कोटी २२ लाख ३० हजार किमतीचे हे काम आहे. देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुमारे चार वर्षापूर्वी सुरु करण्यात आले. तत्पूर्वी रेल्वे फाटक क्रमांक ५३२ च्या दोन्ही बाजूला तुमसर गोंदिया राज्य मार्गावर पोपचमार्गाचे बांधकाम करण्यात आले. गत एक वर्षापासून दोन्ही बाजूचे पोचमार्ग खड्डेमय झाला आहे. या पोचमार्गावर अर्धा फुट खोल खड्डे पडले आहेत.
मध्यंतरी शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर संबंधित विभागाला जाग आली. आता निविदा प्रक्रिया झाली असून या कामाला किमान तीन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान तुमसर-गोंदिया-रामटेक राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आले.
सदर रस्त्यावर प्रचंड मोठी वाहतूक आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यातूनच जावे लागते. उड्डाणपुलाचे काम पुन्हा वर्षभर रखडले तर तिसºयांदा संबंधित विभाग पोचमार्ग दुरुस्तीकरिता निधी देणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच बांधकाम स्थळी रिफ्लेक्टर लावण्याची गरज आहे. रात्री या भागात अंधार असल्याने अपघाताची कायम भीती आहे.