‘देवधान’ आले लोंबीवर
By Admin | Updated: October 4, 2015 01:22 IST2015-10-04T01:22:20+5:302015-10-04T01:22:20+5:30
पेरणीपासून मळणीपर्यंत बेभरवशाच्या धान शेतीत घडाई पेक्षा मडाईच अधिक आहे. जिवापाड निगराणी करुनही फारसे काही मिळत नाही.

‘देवधान’ आले लोंबीवर
निसर्गनिर्मित : देवतांदळाची अधिक मागणी
राजू बांते मोहाडी
पेरणीपासून मळणीपर्यंत बेभरवशाच्या धान शेतीत घडाई पेक्षा मडाईच अधिक आहे. जिवापाड निगराणी करुनही फारसे काही मिळत नाही. अशातच पेरणी विना, रोवणीविना अन् खताशिवाय तयार होणारे निसर्गनिर्मित देवधान आता लोंबीवर आले आहे.
खोलगट जागा, रिकामी व साचलेल्या पाण्यात नैसर्गिकरित्या देव धानाचे पिक तयार होते. या देवधानाला ग्रामीण भागात ‘परसोडी’ या नावाने ओळखले जाते. साधारणत: जिथे कमी/मध्यम प्रमाणात पाणी सिचिंत असने अशा ठिकाणी देवधानाचे पिक हमखास बघायला मिळते. सद्यास्थितीत देवधानाची पूर्णत: वाढ झाली आहे. देवधानाच्या लोंबी भरत आहेत. या महिन्याअखेर पर्यंत धानलोंबी परिपक्व होण सुरु होईल. देवधानाची लोंबी परिपक्व झाल्यानंतर विशेषत: ढिवर समाजातील बांधव व पांगुळ देवधानाची झाडपी करतात.
या देवधानाला कापणीची पध्दत नाही विशेषत: पहाटेच्या वेळी धान झाडणी करणारे परडा व ताटीच्या साहाय्याने दररोज देवधानाची झाडणी केली जाते. तलाव, बोडी, जिथे पाण्याचा ओलावा टिकून आहे अशा ठिकाणी देवधानाचे पिके आलेली आहेत. वरठी- तुमसर रस्त्यावर प्लॉटींग केली गेली आहे. त्या ठिकाणी साधारणत: अर्धा एकरात देवधानाचे पिक डौल्लात उभे आहे. तसेच मोहाडीच्या चौडेश्वरी मंदिराच्या मार्गाने कान्हगावकडे जाणाऱ्या मोरगावच्या तलावात हे देवधान हमखास दिसून येत आहे.
देवधानाचा वापर उपवासासाठी केला जातो. देवधानापासून ‘भगर’ तयार केली जाते. बाजारातील अन्य तांदळाच्या तुलनेत देवतांदळाची किंमत दुप्पट असते. देवधानाचे उत्पन्न कमी असल्याने तसेच निसर्ग निर्मित तांदुळ असल्याने या तांदळाची किंमत अधिक असते.
ऋषीपंचमी, नवरात्रीला उपवास करणारे या देवतांदळाच्या भात बनवून खातात. विशिष्ट काळात मिळणारे दे देवतांदूळ वर्षभर उपलब्ध नसतात. स्वाभाविकच उपवासक साबुदान्याचा उपयोग करतात. तरी काही विशिष्ट व्यक्ती देवतांदूळ मिळव्यासाठी शोध लावतात व तेच घेणे पसंत करतात. दरवर्षी नवरात्रीत्सवाला मोहाडी तालुक्यात मोहाडी येथे चौडेश्वरी मंदिरात जवळील गायमुख नदीवर यात्रा भरते. या यात्रेत दूरवरुन भाविक येतात. स्नान करुन त्याच ठिकाणी स्वयंपाक करुन उपवास सोडतात. या स्वयंपाकात काही प्रमाणात देवतांदळाचा उपयोग केला जातो.