४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:44 IST2017-06-29T00:44:23+5:302017-06-29T00:44:23+5:30

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे.

Debt relief benefits to 43 thousand farmers | ४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

नाना पटोले : ३२७ कोटींची होणार जिल्ह्यात कर्जमाफी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे. यासोबतच नवीन कर्ज वाटपासंबंधीचे प्रस्ताव बँकांनी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दुबार पेरणीची परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होईल तेथे बियाणे वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, जिल्हा बँक व्यवस्थापक संजय बरडे यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ३० जून २०१६ रोजी अल्प आणि अत्यल्प थकबाकीदार सभासदांची एकूण संख्या २९ हजार ९६५ असून थकबाकीची रक्कम १८५ कोटी ६९ लाख एवढी आहे. यापैकी दीड लाखांच्या आतील थकबाकीदार सभासदांची संख्या २६ हजार ८२५ असून थकबाकीची रक्कम १४५ कोटी ८६ लाख एवढी आहे. तर ३१४० सभासद दीड लाखाच्यावर असून थकबाकीची रक्कम ३९ कोटी ८३ लक्ष एवढी आहे.
खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २८९ कोटी ९५ लाख कर्जवाटपाचा लक्षांक होता. त्यापैकी २३ जून २०१७ अखेर ४७ हजार ७४२ सभासदांना २१६ कोटी ८२ लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आले असून कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे.
जून महिन्यात जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १८२ मि.मी. एवढे असते. मात्र यावर्षी १ जून ते २८ जून २०१७ दरम्यान केवळ ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या बऱ्याच भागात दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होवू शकते. ही बाब लक्षात घेता ज्या ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असेल अशा गावांचा कृषी विभागाने सर्वे करावा व बियाणे दयावे अशा सूचना खासदार पटोले यांनी दिल्या.
राष्ट्रीयकृत बँकामधून ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या १३ हजार १०२ असून थकबाकीची रक्कम १४२ कोटी सात हजार एवढी आहे. यामध्ये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९७६५ असून थकबाकीची रक्कम ९० कोटी ७७ लाख एवढी आहे. अल्प कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३३३७ एवढी असून थकबाकीची रक्कम ५१ कोटी ३० लाख आहे. राष्ट्रीयकृत बँकातर्फे १५ जूनअखेर ६६५२ सभासदांना ४८ कोटी ३७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे.

Web Title: Debt relief benefits to 43 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.