दुचाकी-बैलगाडी धडकेत तरूणाचा मृत्यू
By Admin | Updated: March 21, 2017 00:25 IST2017-03-21T00:25:27+5:302017-03-21T00:25:27+5:30
लाखांदूरकडून वडसाकडे जाणाऱ्या मार्गावर बैलगाडीला दुचाकीची जोरदार धडक लागली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.

दुचाकी-बैलगाडी धडकेत तरूणाचा मृत्यू
महिला गंभीररीत्या जखमी : रूग्णवाहिकेअभावी गेला तरूणाचा जीव
लाखांदूर : लाखांदूरकडून वडसाकडे जाणाऱ्या मार्गावर बैलगाडीला दुचाकीची जोरदार धडक लागली. यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. यात महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना सोमवारला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास लाखांदूर-वडसा मार्गावर घडली.
प्रफुल्ल दिवाकर ढोरे (२६) रा. ओपारा, असे मृतकाचे नाव असून मीरा सुधाकर भर्रे (६७) रा.मांदेड असे जखमी महिलेचे नाव आहे. लाखांदूर येथील कार्यक्रम आटोपून प्रफुल हा दुचाकीने मीरा भर्रे यांना घेऊन लाखांदूरहून मांदेडकडे जात होता. दरम्यान या रोडवरील राजेंद्र ट्रेडर्ससमोर सिमेंट, सळाख घेऊन जाणारी बैलगाडी वळणावरून मुख्य रस्त्यावर येत असताना दुचाकी चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी सरळ बैलगाडीवर चढली. त्यात एक सळाख प्रफुल्लच्या गळ्यात शिरली. यात त्याचा गळा अर्धआधीक कापल्या गेला. मागे असलेली महिला बाजुला फेकल्या गेल्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस साठवणे यांनी खाजगी वाहनाने दोघांना लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात भरती केले. जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविणे गरजेचे होते. परंतु तीन रूग्णवाहिका उपलब्ध असलेल्या रूग्णालयात एक रूग्णवाहिका नादुरुस्त तर दोन रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एक तासाच्या प्रतिक्षेअंती उपचाराअभावी प्रफुल्लचा मृत्यू झाला. मदतीसाठी धावून येणारे हुंदके देत स्तब्ध झाले. यावेळी नगर पंचायत सदस्य निकेश दिवटे, प्रल्हाद देशमुख, लता प्रधान, सुनील तोंडरे, लीलाधर ढोरे यांनी त्याला रूग्णालयात आणून जीव वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. रूग्णवाहिकेअभावी त्याला जीव गमवावा लागला. (शहर प्रतिनिधी)
- तर प्रफुल्लचा जीव वाचला असता
लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात नेहमीच रूग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुये रूगणाचा जीव गमावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. आजचा दिवस अनेकांना हुंदके देणारा ठरला. प्रफुल्लला रूग्णालयात आणले तेव्हा त्याचा गळा कापलेला होता, श्वास सुरू होता, कुणीतरी रूग्णवाहिका बोलावा म्हणून ओरडत होते, रूग्णालयात ३ रूग्णवाहिका मात्र वेळेवर एक नादुरुस्त तर दोन रूग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रूग्णाला हलविता आले नाही. इकडे डॉक्टर गळ्याला टाके देण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू प्रफुल्लला श्वास घेणे कठीण जात होते, काहीजण रूग्णालयाच्या दारासमोर रूग्णवाहिका येणार म्हणून बघत होते, तब्बल एक तास प्रफुलने मृत्यूशी झुंज देत होता. रूगवाहिका आली नाही अखेर प्रफुल्लने जगाचा निरोप घेतला.