वरठी येथील घटना : १५ दिवसांतील तिसरी घटना
वरठी : धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे एका ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास भंडारा रोड रेल्वे स्थानकावर घडली. पी. रविबापू रा.अंकापल्ली, आंध्र प्रदेश असे मृताचे नाव असून रेल्वे अपघातात मृत्यू पावल्याची वरठी रेल्वे स्थानकातील १५ दिवसातील ही तिसरी घटना आहे. नागपूरकडे जाणारी आझाद हिंद एक्स्प्रेस वरठी रेल्वे स्थानकावर येताच धावत्या रेल्वेतून रविबापू हे खाली कोसळले. यात त्यांचे दोन्ही पाय रेल्वेने कटले. रेल्वे पोलीस व रेल्वे कर्मचार्यांच्या अभावामुळे रविबापू हे अर्धा तासपर्यंत रेल्वे रूळावर पडून होते.
रेल्वे कर्मचार्यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मागील १५ दिवसांत वरठी रेल्वे स्थानकावर रेल्वेने कटून मृत्यू होण्याच्या तीन घटना घडलेल्या आहेत. १२ दिवसांपूर्वी एका तरूणाने तर चार दिवसांपूर्वी एका महिलेने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. (वार्ताहर) माणुसकी हरवली ४पी.रविबापू हे गंभीर अवस्थेत रेल्वे रूळावर अर्धा तासपर्यंत पडून होते. रेल्वे पोलिसांच्या गैरहजेरीमुळे त्यांना कुणीही हात लावला नाही. वेदनांनी विव्हळत असताना रेल्वे स्थानकावर असलेल्या तमाम प्रवाशांनी त्यांना हात लावला नाही. माणसाला माणसाची दया आली नाही. मदतीसाठी हाक मारत असतानाही कुणीही मदत केली नाही.