मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

By Admin | Updated: May 12, 2017 01:47 IST2017-05-12T01:47:43+5:302017-05-12T01:47:43+5:30

शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून एका शेतकऱ्याला जबर मारहाण केली.

The death of the farmer in the murder | मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

रस्त्याचे प्रकरण : मृत्यू होऊनही खुनाचा गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून एका शेतकऱ्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीररित्या जखमी नेपाल भुरे (५६) यांचा नागपूर येथे बुधवारच्या रात्री उपचारादरम्या मृत्यू झाला.
१ मे रोजी नेपाल भुरे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता सुरेंद्र भुरे, मुलगा देवेंद्र भुरे, पत्नी दुर्गा भुरे व वडील रामदास भुरे यांनी नेपाल भुरे यांना काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर जखमी नेपाल भुरे यांना भंडारा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आले. १० मे राजी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३२४ व ३२६ कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. आता मृत्यू झाल्यामुळे ३०२ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश खंडाते हे करीत आहेत.

पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप
मारहाणीनंतर नेपाल भुरे यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप भुरे कुटुंबियांनी केला आहे. मृत्यू होऊनही आरोपींविरूद्ध भादंवि ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मृतकाच्या कुटंूबियांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस स्वत: गैरहजर राहिले. मृतकाच्या कुटुंबियांची आतापर्यंत पोलिसांकडून विचारपुस करण्यात न आल्याचा आरोप मृतकाचा मुलगा प्रविण भुरे यांनी केला आहे.
दोषी पोलिसांवर कारवाई करा-आ.चरण वाघमारे
दहा दिवसांपासून नेपाल भुरे हे कोमात होते. मात्र पोलिसांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले नाही. पोलिसांनीच आरोपीना मोकळे सोडल्यामुळे मृतकाचा मुलगा प्रविणच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वाद असल्याच्या तक्रारी असूनही पोलिसांकडून हयगय करण्यात आला असून या प्रकरणात दोषी सहायक पोलीस निरीक्षक व ब् ाीट जमादाराला निलंबित करण्याची मागणी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.
अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे जीव गेला
नेपाल भुरे व आरोपींच्या कुटुंबाचा वाद ग्रामस्थांना माहित होता. वडिलोपार्जित शेती असल्यामुळे रस्ता असणे स्वाभाविक होते. मात्र नेपाल भुरे यांना शेतात जाण्यासाठी असलेले दोन्ही रस्ते बंद करण्यात आले. शेतीच्या नकाशावर दोन्ही रस्त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. दुसरा रस्ता बंद केल्यामुळे नेपाल भुरे स्वत:च्या शेताच्या जुन्या रस्त्यातून जात होते. यासाठी त्यांनी तक्रार केल्यानंतर निकाल त्यांच्या बाजूने लागला होता. निकाल लागूनही मज्जाव होत असताना सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यांच्याकडे न्याय मागितला. परंतु गावातील अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला नाही.

Web Title: The death of the farmer in the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.