कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल प्रकरण मजुराच्या मृत्यूचे
By Admin | Updated: May 11, 2014 00:01 IST2014-05-11T00:01:21+5:302014-05-11T00:01:21+5:30
सिपेवाडा येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असताना मनोहर धुर्वे या मजुराचा मातीच्या ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला. मोहन शेंडे रा.रोहणा हा मजूर गंभीररीत्या जखमी झाला.

कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल प्रकरण मजुराच्या मृत्यूचे
दोन जणांना अटक, धुर्वे कुटुंबीयांना मदतीची गरज
लाखनी : सिपेवाडा येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असताना मनोहर धुर्वे या मजुराचा मातीच्या ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला. मोहन शेंडे रा.रोहणा हा मजूर गंभीररीत्या जखमी झाला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी चकोले कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेश हिरामन चकोले रा. पांढराबोडी, जितेंद्र तुकाराम वैद्य रा. वडेगाव, ता.मोहाडी, राजेंद्र परसराम सूर्यवंशी रा.भंडारा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्यांविरुद्ध भादंवि ३०४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यापैकी जितेंद्र वैद्य व राजेंद्र सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास लाखनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव व ठाणेदार जयवंत चव्हाण यांनी भेट दिली. आज सकाळी ७.३० वाजता सिपेवाडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील कर्ता मुलगा गमावल्यामुळे आई गंगाबाई व पत्नी माया यांच्यावर संकट कोसळले आहे. मृतकाच्या कुटुंबाला अद्याप बांधकाम विभागाच्या अधिकार्याने भेट दिलेली नसून कोणतीही आर्थिक देण्याविषयी आश्वस्तही केलेले नाही. सिपेवाडा येथे गावाजवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. माती खोदण्याचे काम जेसीबीद्वारे सुरू आहे. दि.९ ला सायंकाळच्या सुमारास मनोहर धुर्वे या मजुराचा मातीच्या ढिगार्याखाली दबून मृत्यू झाला. मोहन शेंडे रा.रोहणा हा मजूर गंभीररित्या जखमी झाला. सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील चकोले कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे आहे. बांधकाम सुरु करताना कामाबद्दलची माहिती असणारे फलक लावण्याची गरज आहे. परंतु पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी माहितीचे फलक नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही नियमाचे पालन केले नाही. जनतेच्या जाण्यासाठी रपटा तयार केला आहे. त्यावरही कोणतीही सुचना नाही. सर्वसामान्य लोकांसाठी सदर पुलाचे बांधकामाचे ठिकाण धोकादायक ठरणारे आहे. कंत्राटदार व बांधकाम अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे एक मजुराला प्राण गमवावा लागला. या घटनेचा तपास उपनिरीक्षक बरैय्या करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)