जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:32+5:302021-04-06T04:34:32+5:30
भंडारा : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत विविध बाबींवर कडक निर्बंध घालण्याची घोषणा रविवारी केली होती. ...

जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी
भंडारा : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत विविध बाबींवर कडक निर्बंध घालण्याची घोषणा रविवारी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सोमवारी एक आदेश निर्गमित केला. त्यानुसार जिल्ह्यात दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी राहणार आहे. यासोबतच शुक्रवार रात्री ते सोमवारी सकाळ असे दोन दिवस संपूर्ण लाॅकडाऊन जिल्ह्यातही राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर या आदेशान्वये कडक कारवाई केली जाणार आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केला. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे, तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रकालीन संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत कडक लाॅकडाऊन राहणार आहे. वैद्यकीय सेवा, इतर आवश्यक सेवा यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा, सर्व दुकाने, शाॅपिंग काॅम्प्लेक्स पूर्णत: बंद राहतील. जीवनावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक बंधनासह सुरू राहणार आहे. या आदेशाने धार्मिक स्थळे बंद राहणार असून, हेअर सलून, ब्युटीपार्लरही बंद ठेवण्यात येणार आहेत. लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येणार आहे.
बाॅक्स
बस पूर्ण क्षमतेसह कार्यरत
सार्वजनिक वाहतूक बंधनासह कार्यरत राहणार असून, ऑटोरिक्षांसाठी चालक आणि दोन प्रवासी, चारचाकी टॅक्सीसाठी चालक आणि आरटीओने निश्चित केलेल्या आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. बसमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या आसन क्षमतेच्या पूर्ण क्षमतेसह कार्यरत राहील; परंतु उभ्याने बसमध्ये प्रवास करण्यास मज्जाव राहणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेत पूर्णपणे मास्क घालणे अनिवार्य राहील. तसे न केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. खासगी वाहतूक करणारी वाहने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरूच राहतील, तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक बाबीकरिता वरील कालावधीव्यतिरिक्तही संचार सुरू राहील.
उपाहारगृहे, बार बंद राहतील
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सर्व उपाहारगृहे, बार बंद राहतील. पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहील. शनिवार व रविवार रोजी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत केवळ होम डिलिव्हरी सुरू ठेवता येईल. ज्या हाॅटेलमध्ये रेस्टाॅरंटमध्ये निवासी व्यवस्था आहे तेथील अतिथींसाठी रेस्टाॅरंट सुरू ठेवता येणार आहे. होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लसीकरण न झाल्यास १५ दिवसांच्या आतील कोरोना निगेटिव्ह चाचणी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
रस्त्यावरील खाद्य दुकानांना पार्सल सुविधा
रस्त्यावरील खाद्य दुकानांना पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. पार्सलकरिता प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी सामाजिक अंतराचे मार्किंग करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणारी दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. येथे काम करणाऱ्यांनी कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक करण्यात आले आहे.