घरच्या भाकरी खाऊन प्रचार करण्याचे दिवस आता संपले

By Admin | Updated: September 29, 2014 00:39 IST2014-09-29T00:39:36+5:302014-09-29T00:39:36+5:30

एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या

The days of propagation of food at home have ended | घरच्या भाकरी खाऊन प्रचार करण्याचे दिवस आता संपले

घरच्या भाकरी खाऊन प्रचार करण्याचे दिवस आता संपले

भंडारा : एक काळ होता. पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन उमेदवाराच्या प्रचार कामासाठी पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरत होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने एखाद्या उमेदवाराच्या पारड्यात मते टाकण्याचे आदेश दिले की, संपूर्ण गाव त्या उमेदवाराला मतदान करीत असायचे. त्या काळात प्रत्येक कार्यकर्ता दिवसभर परिश्रम घेऊन उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करीत होता. दिवसभर चिवडा खाऊन सायकलने गाव अन् गाव प्रचारासाठी पिंजून काढत होते.
आता प्रचार मोहीम ही संगणक युगात बदलेली आहे. काळ बदलला तशा प्रचाराच्या तऱ्हाही बदलल्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे पैशाशिवाय आता कोणतेच काम होत नाही.
निवडणुका आल्या म्हणजे कार्यकर्तेही आता दिवाळी साजरी करु लागलेत. एरव्ही पाच वर्षे लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना विचारत नाही. मग आता का यांना सोडायचे, असे कार्यकर्ते बोलू लागलेत. निवडणुकीची तारीख ठरली. जे उमेदवार निश्चित आहेत त्यांच्याकडे प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे.
वाहनांची बुकिंग झाली आहे. कार्यकर्त्यांना रोजंदारीही ठरली आहे. ४०० रुपए रोज, दोन वेळचा नाश्ता, दोन-तीन वेळा चहा आणि रात्रीचे जेवण, तेही हॉटेल किंवा धाब्यावरच असे करार कार्यकर्त्यांशी झाले आहेत. सकाळी १० वाजता गांड्यामध्ये बसायचे व मतदारसंघात फिरायचे. ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चितच आहे त्यांचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत.
दि. १ आॅक्टोंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. त्यानंतर डोळ्यात तेल घालून उमेदवारांना यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी विश्वासातील कार्यकर्तेही हिमतीला हवेत. दररोज जर प्रचार मोहीम सांभाळायची असेल तर निष्ठावान कार्यकर्त्यांचीही फळी उमेदवाराला तयार ठेवावी लागणार आहे. असे इमाने इतबारे पक्षाचे काम करणारे कार्यकर्तेही आहेत.
दि.१ आॅक्टोंबरपासून प्रचार सुरु होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील चारचाकी वाहने उमेदवारांनी आरक्षित केले आहेत. उमेदवारी अर्ज भरतांना आपले शक्तीप्रदर्शन दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. पक्षांतर्फे अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच या प्रक्रियेला दोन दिवसांत अधिक वेग येणार आहे. तेव्हाच विधानसभा निवडणुकीचे जिल्हयातील चित्र स्पष्ट होईल. आता केव्हा एकदाची निवडणूक सुरु होते आणि निवडणूक प्रक्रियेला गती येते याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The days of propagation of food at home have ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.