रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: February 12, 2015 00:35 IST2015-02-12T00:35:05+5:302015-02-12T00:35:05+5:30
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात
मोहन भोयर तुमसर
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वे मार्गावर ओव्हरलोड कोळसा मालवाहू रेल्वे गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण नियमांचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. दररोज या रेल्वे मार्गावर सुमारे ८० कोळसा वाहून कसे नेले जात आहे हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो.
कोलवाशरीज मधला कोळसा गंतव्यवस्थानकावर मालगाड्यातून नेला जातो. प्रत्येक कोळसा मालगाडी ही ओव्हरलोड असते. मालडब्ब्यांच्या अगदी टोकापर्यंत कोळसा येथे ठासून भरला असतो. मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर कोळसा भरलेल मालवाहू रेल्वेगाड्या दिवसभर धावतात. सर्वच कोळसा भरलेल्या मालगाड्या ओव्हरलोडच असतात. सरासरी या कोळसा मालवाहू गाड्यांची गती ६० ते ७० कि़मी. प्रति तास असते. ठासून भरलेल्या कोळसा दगडी व भूकटीमय असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या या गाड्यांतून कोळसा खाली पडतो. ढिगाऱ्यासारखा कोळशामुळे प्रवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. शेकडो प्रवाशी फलाटावर गाडीच्या प्रतिक्षेत उभे असतात. मालवाहू कोळसा रेल्वे गाडीतून अलगद पडतो. कधी तो डोळ्यात तर कधी शरीराला इजा करत पडत जातो. क्षणात काय झाले हे प्रवाशांना कळत नाही. पर्यावरण नियमाचे येथे सर्रास उल्लंघन होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक कोळसा येथे मालवाहू रेल्वेगाड्यात सर्रास नेला जात आहे. कोळशासारखा ज्वलनशिल तथा आरोग्यास अपायकारक कोळशाला वाहून नेतानी तो क्षमतेपेक्षा जास्त वाहून नेता येत नाही. तसेच त्या कोळशावर प्लॉस्टिक तथा तत्सम कापड छाकून नेणे बंधनकारक आहे. नियमावर बोट ठेवणारे रेल्वे प्रशासन यासंदर्भात काहीच बोलायला तयार नाही.
मागील अनेक महिन्यापासून बिनबोभाट कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू आहे. तुमसरपासून केवळ ८१ कि़मी. अंतरावर दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय नागपूर येथे आहे. नागपूर पलीकडून हा कोळसा वाहून नेला जात आहे. येथे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.