वन कर्मचाऱ्यांच्या संपाने जंगलाची सुरक्षितता धोक्यात
By Admin | Updated: August 25, 2014 23:47 IST2014-08-25T23:47:56+5:302014-08-25T23:47:56+5:30
जंगलाची सुरक्षितता ज्यांच्या हातात आहे, अशा वनकर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. यात जिल्ह्यातील वनपाल, वनरक्षक व वनकामगार सहभागी

वन कर्मचाऱ्यांच्या संपाने जंगलाची सुरक्षितता धोक्यात
भंडारा : जंगलाची सुरक्षितता ज्यांच्या हातात आहे, अशा वनकर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. यात जिल्ह्यातील वनपाल, वनरक्षक व वनकामगार सहभागी झाल्याने जंगलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर वनरक्षक, वनपाल यांचे अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करणे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शासन दरबारी खेटा घातल्या. मात्र राज्य शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या भंडारा शाखेच्या माध्यमातून भंडारा येथील उपवन संरक्षक कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील वनकर्मचाऱ्यांनी या संपात सक्रीय सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील ५७ वनपाल, १९९ वनरक्षक व २८० वनकामगार असे ५३६ वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करणे, इतर विभागांना मिळालेला निश्चित प्रवास भत्ता वनकर्मचाऱ्यांनाही मंजूर करणे, पोलीस विभागाप्रमाणे वनकर्मचाऱ्यांनाही सोयी-सवलती व भत्ते देण्यात यावे, वनसंरक्षणात कर्मचारी मृत्यू पावल्यास त्याच्या कुटूंबियांना १० लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, बीट वनरक्षक वनसंरक्षणाचे व्यतिरिक्त जास्तीचे काम देवू नये, २४ तासाच्या सेवेऐवजी आठ तासांची सेवा करावी व रजा राखीव पदाची निर्मिती करावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे.
भंडारा शाखेच्यावतीने विजय मेहर, टी.एच. घुले, पी.व्ही. घुले, मिलिंद घोरमोरे, बी.टी. बागडे, यु.बी. हटवार, सय्यद शकील, आय.एच. काटेखाये, ए.एन. नरडंगे, बी.एल. डोरले, गौरी नेवारे, ए.यु. बडोले, उचिबगले आदींच्या नेतृत्वात हा संप सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)