शेतात पाणी साचल्याने धानपिकाचे नुकसान
By Admin | Updated: February 1, 2017 00:21 IST2017-02-01T00:18:46+5:302017-02-01T00:21:43+5:30
जमनी येथील तलाठी साझा क्रमांक १३ मधील गट नंबर ८५/२ या शेतजमीनमध्ये घेण्यात आलेल्या धानपिकाचे नुकसान झाले आहे.

शेतात पाणी साचल्याने धानपिकाचे नुकसान
तहसीलदारांना निवेदन : नुकसानभरपाईची मागणी
भंडारा : जमनी येथील तलाठी साझा क्रमांक १३ मधील गट नंबर ८५/२ या शेतजमीनमध्ये घेण्यात आलेल्या धानपिकाचे नुकसान झाले आहे. शेतीला लागून असलेल्या लेआऊट धारकाने पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचा मार्ग अडविल्यामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्याचा आरोप भूपेंद्र वातुजी लांबट रा.दाभा यांनी केला आहे.
या संंदर्भात दोषींवर दंड वसुलीची कारवाई करून झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणीही लांबट यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित गट क्रमांकाच्या शेतीजवळ गैरअर्जदाराने गणेशनगरी ले आऊट नामक वसाहत निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सदर ले आऊट बांधकाम प्रसंगी पुरातन काळापासून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गणेश नगरीजवळ असलेला मार्ग माती घालून बंद करण्यात आला. परिणामी पावसाचे पाणी लांबट यांच्या शेतातच साचून राहिले. त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले. सद्यस्थितीत सदर जमीन उपजाऊ नसल्याने लांबट यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन दोषींवर दंड वसुलीची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)