नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित
By Admin | Updated: March 19, 2015 00:33 IST2015-03-19T00:33:10+5:302015-03-19T00:33:10+5:30
रानडुकरांनी धानाचे पोत्यांची नासधूस करून धान उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून नेला.

नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित
सालेभाटा : रानडुकरांनी धानाचे पोत्यांची नासधूस करून धान उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचा घास हिरावून नेला. शासनाकडून अजूनही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहे.
मौजा खेडेपार येथील महादेव आकडू इलमकार यांचे नावाने गट नंबर २१८ आराजी ०.४३ हे.आर. शेतजमीन आहे. खरीप हंगामात उसन उधार करून शेतात जय श्रीराम वाण धानाची पेरणी केली. धानाची सर्वतोपरी देखभाल केल्यानंतर धान कापणी करून मशीनने मळणी केली. शेतातील धानाची मळणी रात्री उशीरा पर्यंत झाल्यामुळे जय श्रीराम धानाचे १६ पोते शेतातच ठेवण्यात आले. त्यानंतर ते घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी धान पोते नेण्यासाठी ते शेतावर आले असता त्यांना रानडुकरांनी धानपोत्यांचे नुकसान केल्याचे दिसून आले.
त्याची माहिती वनविभगाला देऊन् तीन महिन्याचा कालावधी लोटूनही मदत मिळाली नाही. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करूनही प्रश्न मार्गी लागले नाही. त्यामुळे रानडुकरांनी धानपिकाची नासधूस करून आर्थिक संकटात पडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार तर नाही अशी शंकेची पाल चुकचुकत आहे.
वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दैनावस्था बघून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)