वादळग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी
By Admin | Updated: July 2, 2014 23:14 IST2014-07-02T23:14:17+5:302014-07-02T23:14:17+5:30
१० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले.

वादळग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी
कऱ्हांडला : १० जून रोजी सायंकाळी अचानक जोरदार वादळासहित मुसळधार पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडून गेलेत, कित्येक घरांच्या भिंतींना तडे गेले. हजारो वृक्षाची पडझड झाली. उन्हाळी धान पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे लाखोची हानी झाली. लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला, विरली बु., राजनी, विरली खुर्द, नांदेड, ईटान, दोनाड, रोहनी, खैरना, मोहरना, कुडेगाव, डोकेसरांडी, ओपारा, किरमटी आदी गावातील वादळग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य मनोहर महावाडे यांनी केली आहे.
विद्युत तारांची जोडणी करावी अशीही मागणी केलेली आहे. वादळाने विरली विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २२ गावातील झाडे विद्युत तारावर पडले. त्यामुळे विद्युत तारा आणि विद्युत खांब तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. २० दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही. पावसाने डोळे वटारलेले असून पऱ्ह्यांना पाणी देण्याची समस्या शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस चांगल्या प्रमाणात असून पावसाला सुरूवात झाली, असा अंदाज शेतकऱ्यांनी लावला. मोठ्या प्रमाणावर खरीप धान पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सध्या पाऊस थांबला असून पेरणी केलेले पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल कोरडवाहू शेतकऱ्याप्रमाणे झाले आहे. पऱ्हे जगविण्यासाठी सिंचनाची सुविधा व्हावी या हेतूने विद्युत वितरण कंपनीने तुटलेल्या विद्युत तारा आणि विद्युत खांब जोडणी करून विद्युत प्रवाह सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. (वार्ताहर)