पाण्याअभावी पिकांचे नुकसान
By Admin | Updated: November 13, 2014 22:57 IST2014-11-13T22:57:45+5:302014-11-13T22:57:45+5:30
तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकऱ्यांच्या शेतीला गुढरी जलाशयाचे पाणी मिळाले नाही. परिणामी या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर

पाण्याअभावी पिकांचे नुकसान
साकोली : तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकऱ्यांच्या शेतीला गुढरी जलाशयाचे पाणी मिळाले नाही. परिणामी या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आधीच निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मागील वर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असतांना अधिकाऱ्यांच्या मनमानीचाही सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला 'अच्छे दिन आयेंगे'ची स्वप्न दाखविली. त्याचा राजवटीत हेच का अच्छे दिन? अशी म्हणण्याची वेळ जांभळी सडक येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकरी चंद्रशेखर रामटेके, भाऊराव मेश्राम, भाऊराव रामटेके, अशोक नागदेवे, रवि चोपकर, मंगल तिरपुडे, भागवत पात्रीकर, किशोर नंदुरकर यांच्यासह इतर दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची गरज होती. गुढरी जलाशयाचे पाणी २९ सप्टेंबरपासून शेतीला सोडण्यात आले.
या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहचलेच नाही. पाण्याअभावी या शेतकऱ्यांचे पीक करपले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी वाटप करतांना चुकीचे धोरण अवलंबिले. या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या पाणी वाटप प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जर दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करु, असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)