धरणाचे पाणी पोहचलेच नाही
By Admin | Updated: May 22, 2017 00:43 IST2017-05-22T00:43:08+5:302017-05-22T00:43:08+5:30
जीवनदायीनी वैनगंगा नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. बावनथडी धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात आला

धरणाचे पाणी पोहचलेच नाही
राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जीवनदायीनी वैनगंगा नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. बावनथडी धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात आला असला तरी तो वैनगंगेत पोहचलाच नाही. परिणामी, तुमसर शहरात भिषण जलसंकट निर्माण झाले आहे. या जलसंकटाला प्रतिउत्तर देण्याकरिता पालिका प्रशासन शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहे.
गतवर्षी पडलेला अत्यल्प पाऊस व वाढत्या प्रदुषणामुळे तापमानात झालेल्या वाढीमुळे फेब्रुवारी महिन्यात जीवनदायनी वैनगंगा नदीतील पाणी आटण्याला सुरुवात झाली होती. मे महिन्याच्या शेवटी उद्भवणारी स्थितीने मार्च व एप्रिल महिन्यातच डोकेवर काढले. भविष्यातली उद्भवणारी जलसंकट लक्षात घेता बावनथडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे म्हणून आमदार, खासदार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दखलही झाली. बावनथडी धरणाचे पाणी सोडण्यात आले.
धरणाचे पाणी सोडल्याने जनतेची तहान भागविली जाणार होती. परंतू तसे काही झालेच नाही व आणखीही विदारक स्थिती निर्माण झाली. नदीपात्रातील पाणी आटले असतांना देखील नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांच्या पुढाकाराने नदीपात्रात पोकलँड लावून डोहातील पाणी इंटकवेल पर्यंत आणले. पाणी आटल्याने तुमसरकरांना नळाचे पाणी मिळण्याची आशा धुसर झाली आहे. या स्थितीचा सामना करण्याकरिता पालिकेने शहरातील विविध भागात सहा इंच बोअरवेलचे खोदकाम केले त्या बोअरवेलमधून टँकरने पाण्याचा उपसा करुन शहरवासीयांना पाणी पुरवठा करणार होते. मात्र तिथेही मांजर आडवी गेली. खोदलेल्या बोअरवेल मध्ये पाणीच लागले नाही. यापैकी काही बोअरवेलला पाणी लागले परंतू ते बोअरवेल शहरवासीयांना पाणीपुरवठा करु शकत नाही. परिणामी शहरातील पुरातन व मोठ्या विहिरीचा शोध घेवून त्याचा उपसा करून तुमसरवासियांना पाणीपुरवठा करणे सुरु आहे.
त्यात शहरातील राष्ट्रीय विद्यालयातील मोठी विहिर, जयपुरिया भवनातील विहिर, भुजली तलावनजिकची विहिर, खापाटोली येथील धांडे यांच्या घराजवळील विहिरीचा समावेश असून आणखीही विहिरीचा शोध सुरु आहे. एवढे शर्तीचे प्रयत्न नगर पालिका प्रशासनाद्वारे सुरुच आहेत. मात्र उन्हाची दाहकता लक्षात घेता पाण्याचे स्त्रोत आटून भिषण पाणी टंचाईच्या समस्येत अजुन वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
वैनगंगा पुर्णत: कोरडी पडल्याने तुमसरात जलसंकट निर्माण झाले आहे. संकटाला सामोरे जाण्याकरिता न.प. प्रशासन पुर्ण ताकदीनीशी उभी आहे. ही नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याच्या दुरुपयोग कमीत कमी १५ दिवस दमदार पाऊस येस्तोवर टाळून पाणी टंचाई स्थितीवर मात करता येवू शकते जनतेनेही सहयोग करावा.
प्रदीप पडोळे,
नगराध्यक्ष तुमसर