बापरे ! कोरोनाचे नऊ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:41+5:302021-04-06T04:34:41+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच सोमवारी तब्बल ९ जणांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना संसर्गापासून आजपर्यंतचा ...

बापरे ! कोरोनाचे नऊ बळी
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच सोमवारी तब्बल ९ जणांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोना संसर्गापासून आजपर्यंतचा मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान सोमवारी ६५६ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून २८३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ५३४३ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग इतर जिल्ह्याच्या मानाने कमी होता. मृतांचे प्रमाणही नगण्य होते. मात्र गत आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येचा स्फोट झाला. दररोज ६०० ते ७०० रुग्ण पाॅझिटिव्ह येऊ लागले. मात्र मृत्यू कमी होते. सोमवारी कोरोना संसर्गापासून आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा गाठला. जिल्ह्यात नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील सहा व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये ३१ वर्षीय महिला, ४५ वर्षीय दोन आणि ७४ वर्षीय एक पुरुष आणि ५४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्वांचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू वाॅर्डात मृत्यू झाला तर ३८ वर्षीय पाॅझिटिव्ह पुरुष रुग्णाचा रुग्णालयाच्या वाटेतच मृत्यू झाला. तसेच लाखांदुर तालुक्यातील ८० वर्षीय महिला, मोहाडी तालुक्यातील ६५ वर्षीय महिला व पवनी तालुक्यातील एका ६५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या कोविड आयसीयू वाॅर्डात मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक मृत्यू हे ५० वर्षावरील व्यक्तींचे असल्याचे दिसत आहे. मात्र सोमवारी ३८ वर्षीय, ३१ वर्षीय आणि दोन ४५ वर्षीय व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू पाहत आहे.
जिल्ह्यात २४९५ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात २६२, मोहाडी ४८, तुमसर १५४, पवनी ५५, लाखनी ९६, साकोली १८ आणि लाखांदुर तालुक्यातील २३ असे ६५६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३ हजार ५५९ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २१ हजार ५१७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी १५ हजार ८१३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना रिकवरी रेट ७३.४९ टक्के आहे. गत दोन महिन्यापूर्वी हा रेट ९५ टक्क्यापर्यंत पोहचला होता. तर मृत्युदर १.६८ टक्के झाला आहे.
५४४३ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी ५३४३ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यात भंडारा तालुक्यात २३८७, मोहाडी ५५५, तुमसर ६९६, पवनी ६९५, लाखनी ५७४, साकोली २५७ आणि लाखांदूर तालुक्यात १७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील काही रुग्णांवर रुग्णालयामध्ये तर काही रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असतानाही नागरिक मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत. दुसरीकडे कोरोना लस घेण्याबाबतही उदासीन दिसून येत आहेत.