बापरे ! एकाच दिवशी ५६६ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:53+5:302021-04-01T04:35:53+5:30
भंडारा : कोरोना मुक्तीच्या वाटेवर असलेल्या भंडारा जिल्ह्यात मार्च महिन्यात वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ...

बापरे ! एकाच दिवशी ५६६ पाॅझिटिव्ह
भंडारा : कोरोना मुक्तीच्या वाटेवर असलेल्या भंडारा जिल्ह्यात मार्च महिन्यात वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. महिन्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी तर तब्बल ५६६ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. प्रत्येकाच्या तोंडून ‘बापरे’ हाच शब्द निघत होता. रुग्णसंख्या वाढत असताना नागरिक मात्र कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत.
भंडारा जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतर रुग्ण वाढीची संख्या अतिशय मंद होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा अपवाद वगळल्यास कोणत्याही दिवशी २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले नाहीत. मात्र अलीकडे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढायला लागली. त्यातही सर्वाधिक रुग्ण भंडारा शहरातील आहेत. बुधवारी २१४१ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात २८१, मोहाडी ५०, तुमसर ४६, पवनी १२५, लाखनी २४, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात २४ असे ५६६ रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यात आता रुग्णांची एकूण संख्या ७६४२ झाली आहे. मोहाडी १२९७, तुमसर २२०८, पवनी १९४०, लाखनी १८९२, साकोली १९२९ आणि लाखांदूर तालुक्यात ७३७ असे १७ हजार ६४५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती.
जिल्ह्यात बुधवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून कोरोना बळींची संख्या आता ३४३ वर पोहचली आहे. भंडारा तालुक्यातीलच दोनही व्यक्ती असुन एक ५५ वर्षीय आणि दुसरी ६३ वर्षीय आहे. दोघांचाही मृत्यू भंडारा येथील खासगी रुग्णालयात झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७७ हजार २५० व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १७ हजार ६४५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले असून १४ हजार ७६० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
प्रशासन एकीकडे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाय योजत असले तरी नागरिक मात्र नियमांचा फज्जा उडविताना दिसत आहेत. भंडारा जिल्ह्यातील स्थिती आता लाॅकडाऊनच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत, कोरोना वेगाने वाढत असताना नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या सोबतच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी जिल्ह्यात २५४२ ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यात भंडारा ११९०, मोहाडी १५३, तुमसर २६३, पवनी ४५६, लाखनी २८४, साकोली १३६ आणि लाखांदूर तालुक्यात ६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी काही रुग्णांवर रुग्णालयात तर काही रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० पर्यंत खाली आली होती. मात्र गत आठवड्याभरातच ही संख्या वेगाने वाढली.