सायबर कॅफे तरुणांसाठी भेटीचा ‘अड्डा’

By Admin | Updated: May 21, 2015 00:41 IST2015-05-21T00:41:57+5:302015-05-21T00:41:57+5:30

शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळींमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनेट सुविधा असलेले ‘सायबर कॅफे’ सुरू झालेले आहेत.

Cyber ​​cafes visit 'haunts' for youth | सायबर कॅफे तरुणांसाठी भेटीचा ‘अड्डा’

सायबर कॅफे तरुणांसाठी भेटीचा ‘अड्डा’

एकाही कॅफेत कॅमेरे नाहीत
निवांत क्षणासाठी मोजावे लागतात जादा पैसे
बंदी असूनही ‘त्या’ साईटस्चा वापर
प्रशांत देसाई भंडारा
शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळींमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनेट सुविधा असलेले ‘सायबर कॅफे’ सुरू झालेले आहेत. कॅफेचा ज्ञानार्जन, नोकरी किंवा तत्सम माहिती मिळविण्यासाठी वापर होणे गरजेचे आहे. मात्र, या केंद्राचे आता स्वरूप बदलले असून हे ठिकाण नव्हे, तर मित्र-मैत्रीणींसोबत ‘निवांत क्षण’ घालविण्याचे केंद्र बनले आहे.
यासाठी कॅफे चालकांकडून ‘स्पेशल रेट’ सह व्हीआयपी सेवाही पुरविली जात आहे. बाहेरून सायबर कॅफे, तर आतून ‘अश्लिलता’ असा काहीसा प्रकार सायबर कॅफेत सुरू आहे. एरव्ही तपास कामात ‘कानून के हात लंबे होते है!’ असे म्हणणाऱ्या पोलिसांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.
कॅफेमध्ये येणाऱ्यांची आणि ते किती वेळ बसले याची रजिस्टरमध्ये नाव नोंदणी करणे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे अनिवार्य आहे. असे असतानाही कॅफे संचालकांकडून ‘सायबर’च्या या नियमांना तिलांजली देण्यात आली आहे. शहरातील एकाही सायबर कॅफेत सीसीटीव्ही किंवा रजिस्टर आढळून आलेले नाही. रजिस्टरमध्ये केवळ टेबलनिहाय वेळेची नोंद करण्यात येत असल्याचे आढळून आले. शहरात आजमितीला अनेक सायबर कॅफे सुरू आहेत. मात्र या सायबर कॅफेमधील कामाची तपासणी पोलीस विभागाने केल्याचे आढळून येत नाही. अनेक सायबर कॅफेमध्ये तरूण-तरूणींचा होहल्ला दिसून येतो. मात्र त्यांच्यावर वचक ठेवणाऱ्यांची वाणवा आहे. शहरातील सायबर कॅफेच्या आतमध्ये स्वतंत्र कक्ष बनविलेले असतात. काही ठिकाणी पडदे लावण्यात आलेले आहे तर काही ठिकाणी पार्टिशन आहेत. त्यामुळे पडद्याआड तरूण-तरूणींचे चाळे सुरू असतात. काही कॅफेमध्ये तासन्तास निवांतपणे बसण्यासाठी कॅफे संचालक ५०० रूपयापर्यंत ‘जादा’ शुल्क आकारतात. त्यांना चहा, थंडपेय, आईस्क्रीम व अन्य साहित्यांचा पुरवठाही करण्यात येतो. या तासभरात त्या पडद्याआड असलेल्या कॅबिनमध्ये काय करायचे ते करा, जणू असा मौखिक आदेश मिळाल्याच्या अविर्भावात हे तरूण-तरूणी राहतात.
शहरातील विविध भागात असलेल्या सायबर कॅफेमध्ये हे धंदे आता नित्याचे झाले आहे. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी सायबर कॅफेचे बाहेर फेरफटका मारला असता तोंडाला स्कॉर्फ बांधलेल्या तरूणींचा वावर दिसून आला.
पोलीस प्रशासनाने अशा ठिकाणी कारवाई केल्यास महाविद्यालयीन तरुण-तरुणीसह शाळकरी मुले-मुली आढळून येतील.
काही महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या असून अर्ज भरण्यासाठी तरूण-तरूणी सायबर कॅफेत जात असतात. यासोबतच शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे, नोकरीसाठी अर्ज करणे अशा प्रकारची बरीच कामे आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. त्यासाठी शाळकरी आणि महाविद्यालय तरूण-तरूणी सायबर कॅफेत जातात. यात याच बाबीचा फायदा घेत याठिकाणी हे प्रकार सायबर कॅफे चालकांनी सुरू केला आहे. त्यामुळे पालकांनाही पाल्यांवर लक्ष ठेवण्याची पाळी आली आहे.

वापर बिनधास्त
सायबर कॅफेमध्ये तयार करण्यात आलेल्या कॅबिनच्या आडोशाने अनेक तरूण पोर्नसाईट्स बघत असल्याचे दिसून येते. त्यासाठी त्यांना सायबर कॅफे चालकांकडून मज्जावही करण्यात येत नाही. या प्रकारामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत असल्याचे दिसून येते.
सायबरचे नियम चालकांकडून पायदळी
सर्व सायबर कॅफे चालकांची बैठक बोलावून पोलीस प्रशासनाने त्यांना सूचना देणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी येणाऱ्यांची नोंद असणे, कॅबिन कशा पध्दतीने असाव्यात, त्यात एकापेक्षा जास्त जणांना बसवू नये, अशा सूचना देण्याची गरज आहे. मात्र, या सूचना पायदळी तुडवत काही सायबर कॅफे चालकांकडून असला प्रकार सुरू आहे.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
वृत्तपत्रांमधून सायबर कॅफेवर चालणाऱ्या प्रकारांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचत असते. कारवाई उघड झालेल्या बाबीही माहिती असतात. असे असतानाही पालक केवळ मुलांच्या प्रेमापोटी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता पाल्य काय करतोय याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सायबर सेलसाठी सहा पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील सायबर कॅफे संचालकांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत नोटीस बजाविण्यात येईल.
- सुरेशकुमार धुसर
पोलीस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखा, भंडारा.

Web Title: Cyber ​​cafes visit 'haunts' for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.