परिवर्तनालाच पसंती
By Admin | Updated: October 20, 2014 23:06 IST2014-10-20T23:06:21+5:302014-10-20T23:06:21+5:30
भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले. आघाडी शासनाला कंटाळलेल्या या मतदारसंघात मतदारांनी

परिवर्तनालाच पसंती
आढावा निवडणुकीचा : मतांचे परिवर्तन घडवून आणण्यात भाजपला यश
भंडारा : भंडारा जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचे सत्ता पक्षातील नेत्यांचे दावे भाजपच्या दणदणीत विजयानंतर सपेशल फोल ठरले. आघाडी शासनाला कंटाळलेल्या या मतदारसंघात मतदारांनी राज्यातील सत्ता परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला.
जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली या तिन्ही विधानसभा क्षेत्रात मोदी लाट दिसून आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यात मोठ्या प्रमाणावर मतांचे विभाजन झाले. तरीसुद्धा काँग्रेस, राकाँ, शिवसेनेचा पराभव अनपेक्षित नाही, परंतु भाजपने घेतलेली आघाडी मात्र नक्कीच अनपेक्षित आहे. प्रत्येक ठिकाणी विजयाचा फरक २५ हजाराहून अधिक राहील, हे अपेक्षित नव्हते. खऱ्या अर्थाने हा काँग्रेस, राकाँ, शिवसेनेचा पराभव नसून आघाडी शासनाविषयी असलेला असंतोष आणि मोदी लाटेचा विजय आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
यावेळेच्या निवडणुकीत नवमतदार उत्साही होते. नवमतदारांना परिवर्तन पाहिजे होते. आघाडी शासनाचा भ्रष्टाचार हा मुद्दा आघाडीवर होता. त्यातच तुमसरात मागीलवेळी झालेल्या पराभवाचे शल्य होते. भंडाऱ्यात भाजपकडून शिवसेनेने हिसकावलेली जागा बळकवायची होती तर साकोलीत ही जागा कायम राखायची होती. त्यादिशेने तेव्हापासूनच पक्षाची बांधणी सुरु केली होती. या बांधणीचा पहिला फायदा जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता संपादन केली. पक्षबांधणीचा लाभ लोकसभा जिंकण्यात झाला. त्यानंतर चार महिन्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवून जिल्हा भाजपमय असल्याचे दाखवून दिले. आता नगर पालिकेवर सत्ता संपादन करण्यासाठी भाजप आगेकूच सुरू होणार आहे.
याउलट काँग्रेस, राकाँ, सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबद्दलची तळमळ कमी आणि स्वार्थभाव अधिक असल्यामुळे ते मतदारांपर्यंत कसे पोहोचले, याबद्दल शंकेचे वातावरण आहे. त्यातच सभोवताल वावरणाऱ्या चौकडीविषयीची नाराजी मात्र लपून राहिली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)