गोधन खरेदीला सापडेना ग्राहक

By Admin | Updated: March 30, 2015 00:23 IST2015-03-30T00:23:57+5:302015-03-30T00:23:57+5:30

अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यावर १५ हजाराची बैलजोडी केवळ ३ हजारात विकण्याचा बिकट ओढविलेला आहे.

Customers looking for purchase | गोधन खरेदीला सापडेना ग्राहक

गोधन खरेदीला सापडेना ग्राहक

मोहन भोयर भंडारा
अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यावर १५ हजाराची बैलजोडी केवळ ३ हजारात विकण्याचा बिकट ओढविलेला आहे. तुमसर व सिहोरा येथील गुरांच्या बाजारातील भाव घसरले आहे. हीच स्थिती भंडारा जिल्हयातील प्रत्येक बैलबाजारात बघायला मिळत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी बाजारातून जनावरे परत नेली. रामपूर येथे जनावरे मेल्याची धक्कादायक माहिती आहे. गोवंश हत्याविरोधी कायदयामुळे जनावरे खरेदीदार मिळणे बंद झाल्याने बैल जिथे होते तिथेच ठेवून खरेदीदार निघून गेल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकताच गोवंश हत्या विरोधी कायदा आणला. या कायद्याचा गुरांच्या बाजारात वास्तविक परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. तुमसर येथे मंगळवार व सिहोरा येथे शनिवारी गुरांचा बाजार भरतो. तुमसर व सिहोरा गुरांची मोठी बाजारपेठ आहे. २० किमी अंतरावर मध्यप्रदेशाची सीमा सुरु होते. तेथूनही हजारो जनावरे या बाजारपेठेत विक्रीस येतात. सिहोरा व तुमसर बाजारपेठेतून हजारो गाई व बैल कसाई खरेदी करीत होते. त्यामुळे या जनावरांना मोठा भाव मिळत होता, परंतु शासनाने गोवंश बंदी कायदा आणल्याने या खरेदीदारांनी सध्या बाजाराकडे पाठ फिरविली आहे. त्याचा विक्रीवर परिणाम झाला.
ज्या बाजारात पूर्वी १००० जनावरे विक्री करीता येत होती तिथे केवळ ३०० जनावरे विकत आहेत. जी बैलजोडी तथा जनावरे १५ हजाराला विक्री होत होती. तिची किंमत आता तीन हजारावर आली आहे. बैलांची विक्री कमी झाली आहे. त्यांचे खरेदीदार मिळेनासे झाले आहेत. जे बैल शेतकऱ्यांचे कामाचे नव्हते त्यांची किंमत पूर्वी ४ ते ५ हजाराला विकत होते. त्या बैलांना आता दोन हजाराला कुणी घेत नाही. त्या बैलाना वैरण मिळत नसल्याने त्यांचेवर मृत्यूची वेळ आली आहे.
रामपूर येथे आठवड्यापूर्वी कामठीच्या व्यापाऱ्यांनी जनावरे खरेदी केली होती. बाजारात मूल्य कमी झाल्याने त्यांनी रामपूर येथील ग्रामस्थांना प्रति दिवस १५० रुपये चाऱ्याकरिता दिले होते. चारा नसल्याने त्या जनावरांचे हाल होत आहेत. पिण्याकरिता पाणी नाही. अशातच तीन दिवसापूर्वी तीन जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या जनावंराचे खरेदीदार कामठी येथे राहतात. सध्या ते ढूंकून पाहायला तयार नाहीत. प्रशासन येथे अनभिज्ञ दिसत आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे गाव परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तालुका तथा जिल्हा प्रशासनाने येथे दाखल देण्याची गरज आहे.

Web Title: Customers looking for purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.