तीन कोटींचा चुराडा करणारा तलाव कोरडाच
By Admin | Updated: August 19, 2015 00:58 IST2015-08-19T00:58:27+5:302015-08-19T00:58:27+5:30
मागीलवर्षी सिंदपुरी गावात तलावाची पाळ फुटल्याने गावात पाणी शिरले. यात अंदाजे तीन कोटींचा फटका गावकऱ्यांना बसला.

तीन कोटींचा चुराडा करणारा तलाव कोरडाच
सिंदपुरी तलावाची दुर्दशा : पाणी साठवणुकीला गावकऱ्यांचा नकाररंजित चिंचखेडे ल्ल चुल्हाड
मागीलवर्षी सिंदपुरी गावात तलावाची पाळ फुटल्याने गावात पाणी शिरले. यात अंदाजे तीन कोटींचा फटका गावकऱ्यांना बसला. यंदा मात्र गावकऱ्यांनी तलावात पाणी साठवणूक करण्यास नकार दिल्याने भर पावसाळ्यातही तलाव कोरडाच आहे.
पाण्याची साठवणूक व जलसंधारणावर राज्य शासनाचा भर आहे. परंतु सिंदपुरी येथील तलावाच्या विकासाबाबतीत उदासीनता दिसून येत आहे. मागीलवर्षी २३ जुलैला गावालगतच्या तलावाची पाळ मध्यरात्री फुटली. तलावाची पाळ फुटल्याने विसर्ग होणारे पाणी गावात शिरले. याचा फटका नागरिकांना बसला. याशिवाय १०० एकरहून अधिक शेतीत असणारे धानाची रोवणी वाहून गेली होती. राज्य शासन, जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी आपातग्रस्तांचे संसार सुरळीत स्थितीवर आणण्यासाठी मदतीचा हात दिला होता. या तलावाची जबाबदारी स्वीकारण्यावरून राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभाग आमनेसामने आले होते. यानंतर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने या तलावाचा कायापालट करण्यासाठी कृती आराखडा तयार केला. तब्बल वर्षभराचा कालावधी लोटला परंतु तलावाच्या विकास कामावर पाटबंधारे विभागाचा टिकास आणि फावडा चाललेला नाही. दरम्यान ऐन पावसाळ्यात हा उपेक्षित तलाव धोक्याचे चित्र पुन्हा निर्माण करणार असल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायतमार्फत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यातून फुटलेली पाळ दुरुस्ती करण्यात आली. परंतु, ग्रामस्थांनी पाणी साठवणुकीला नकार दर्शविल्याने या तलावात पावसाळ्याचे पाणी साठवणूक करण्याची हिंमत केली नाही. शासनाच्या उदासीन धोरणाचा मनस्ताप सहन करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.