पवनी : तालुक्यातील खातखेडा गावातील बस स्थानक जवळील तलावात मगर आढळल्याने गावात भितीचे वातावरण असून या मगराला वनविभागाने पकडून अन्यत्र न्यावे, अशी मागणी गावकरी करीत असून तलावात असलेल्या मगराला बघण्याकरीता गावकऱ्यांनी तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची गर्दी तलावाचे पाळीवर पाहण्यास मिळत आहे. दोन तीन वर्षापुर्वी गोसीखुर्द धरणाचे जलसाठ्यात मगर असल्याचे अनेकांनी बघितल्याची चर्चा होती. त्यामुळे सदरचे मगर हे गोसीखुर्द धरणातून कालव्यात सोडलेल्या पाण्यांच्या प्रवाहाने आले असावे व आता नहरात पाणी नसल्यामुळे मगर हे तलावाला लगत असलेल्या नहरातून आले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मगर दिसल्याची चाहूल लागताच सदर मगर हे पाण्यात निघून गेला असता तिथून पळ काढून सदरची माहिती गावकऱ्यांना दिली व गुडेगाव बिटाचे वनरक्षक भारती गजापुरे यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच गजापुरे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी क्षेत्र सहायक ए.एन. खान यांना दिली. माहिती मिळताच खान हे खातखेडा येथे हजर झाले व तलावाकडे जावून सदरची माहिती खरी असल्याची खात्री करून घेतली. तलावाचे काठावर असलेले मगरीचे पगमार्क घेवून लगेच भंडाराचे सहा वनसंरक्षक यांना माहिती दिली. सहा. वनसंरक्षकांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना मगराचे हालचालीवर लक्ष ठेवून राहण्याचे आदेश दिले असून बातमी लिहीपर्यंत सदर मगरीला पकडण्याची कोणतीही कार्यवाही केली नसली तरी १-२ दिवसात त्या मगरीला पकडण्याची कार्यवाही होवू शकते असे संकेत मिळत आहेत.सदरच्या मगराच्या हालचालीवर सावरला क्षेत्र सहा. ए.एन. खान असून त्यांचे सोबत वनरक्षक भारती गजापुरे, आर.व्ही. पडोळे, आय.एस. उसे, बिटरक्षक ए.सी. हटकर, वनमजूर आर.एन. कुर्झेकर, तुकडूदास कुंभले लक्ष ठेवून असून त्यांचे संरक्षणार्थ तलावाचे पाळीवर डेरा मांडून बसले आहेत. (शहर प्रतिनिधी)
खातखेडा तलावात मगरीच्या खुणा
By admin | Updated: November 1, 2014 00:43 IST