शेतकऱ्यांपुढे तुडतुड्याचे संकट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:20+5:30
भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते. मात्र अलिकडे काही वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका दिसत आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली तर हलका धान काढणीला आला असताना अतिवृष्टी झाली. यातून सावरत नाही तोच आता रसशोषक तुडतुड्याचे धानावर आक्रमण झाले आहे.

शेतकऱ्यांपुढे तुडतुड्याचे संकट !
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कधी पावसाची प्रतीक्षा तर कधी अतिवृष्टीचा फटका. अशा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता हातातोंडाशी धान आला असताना तुडतुड्याचे संकट उभे ठाकले आहे. लाखनी, पवनी, लाखांदुर तालुक्यात तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धानाचे पीक तणस होत आहे. कीड नियंत्रण करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे.
भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते. मात्र अलिकडे काही वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका दिसत आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली तर हलका धान काढणीला आला असताना अतिवृष्टी झाली. यातून सावरत नाही तोच आता रसशोषक तुडतुड्याचे धानावर आक्रमण झाले आहे. बुंध्यातून रस शोषून घेत असल्याने धान पूर्णत: उद्ध्वस्त होत आहे. तुडतुड्याचे आक्रमण झाले की धान निसवत नाही आणि धान निसवला तर दाणा भरत नाही. त्यामुळे धानाचे अक्षरश: तणस होते. लाखांदूर, लाखनी, पवनी तालुक्यात ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला असून धानपीक पिवळे झाले आहे.
तुडतुडा तीन प्रकारचा असतो. त्यात हिरवा तुडतुडा, पांढरा तुडतुडा आणि राखाडी तुडतुडा यांचा समावेश आहे. पांढरा आणि राखाडी रंगाचा तुडतुडा हानीकारक आहे आणि याच तुडतुड्याचा प्रादुर्भाव धानावर झाला आहे.
आठवड्यातून दोन फवारण्या करुनही कीड नियंत्रणात येत नाही. एकरी एक हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे संपूर्ण धानपीक उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.
तुमसर तालुक्यातही तुडतुड्याचा प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे. पवनारा, बघेडा, चिंचोली, भोंडकी, मोखे आदी गावात काही शेतांमध्ये प्रकोप दिसून येत आहे. हा प्रकोप पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
असे करा नियंत्रण
- धानावरील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी नत्र खतांची वाजवीपेक्षा जास्त मात्र देऊ नये. या किडींचे सतत निरीक्षण करुन नुकसानीची पातळी गाठताच बुप्रोफेजिन २५ एससी १६ मिली किंवा इमीडाक्लोप्रिड १७.८ एसएल २.२ मिली किंवा ट्रायझोफाॅस ४० टक्के प्रवाही २० मिली किंवा थायमिथाक्झाम २५ डब्लुजी २ ग्रॅम, फिप्रोनिल ५ एससी २० मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भातावरील तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी भाताच्या बुंध्याकडील भागावर तुडतुडे शोषण करतात. तेथे फवारणी करावी.