शेतशिवार चोरांच्या निशाण्यावर

By Admin | Updated: November 4, 2015 00:40 IST2015-11-04T00:40:27+5:302015-11-04T00:40:27+5:30

कास्तकारांच्या उघड्या शिवारातल्या मालावर पाखरांची नेहमीच वक्रदृष्टी असते.

Criminalist thieves | शेतशिवार चोरांच्या निशाण्यावर

शेतशिवार चोरांच्या निशाण्यावर

कास्तकार बेजार : वीज वितरणचा अंधार ठरला सुकाळ
तुमसर : कास्तकारांच्या उघड्या शिवारातल्या मालावर पाखरांची नेहमीच वक्रदृष्टी असते. पण गेल्या वर्षभरापासून उघड्या वावरातून कृषिपयोगी साहित्य चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रामुख्याने कृषिपंप उखडून नेण्याच्या घटना लक्षणीय आहेत. एकीकडे नापिकीशी झुंज द्यायची आणि दुसरीकडे चोरट्यांचा जाच सोसायचा, अशा दुष्टचक्रात कास्तकार सापडले आहेत. विशेष कृषिपंप चोरीची प्रकरणे पोलीस प्रशासनाकडूनही दुर्लक्षित आहेत.
बेभरवशाच्या पावसाला तोंड देऊन उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय करण्यासाठी जिवाचा आटापिटा चालविला आहे. पदरमोड करून प्रसंगी घरातील भांडीकुंडी विकून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतात पाण्याची सोय केली. विहिरीवर कृषिपंप बसविले. शासनानेही पुढाकार घेत अनेकांना सिंचन विहिरी मंजूर केल्या.
बऱ्याच ठिकाणी पाणीही चांगले लागले. मात्र, या पाण्याचा प्रत्यक्ष ओलिताकरिता लाभ होण्यासाठी शेतात २४ तास सुरळीत विजपुरवठा असण्याची नितांत गरज आहे. असे असताना भारनियमनाच्या फेऱ्यातून शेतकऱ्यांची सुटका होताना दिसत नाही.
त्यामुळे पाणी असूनही वीजच नसल्याने पाण्याने भरलेल्या विहिरी आणि त्यावर बसविलेले कृषिपंप बेवारस स्थितीत असल्यासारखे आढळतात. अशा शेतांवर गावातील चोराचपाट्यांची वक्रदृष्टी वळली आहे. वीजपुरवठा नसल्याने ज्या ओलिताविना पडून असलेले कृषिपंप म्हणजे चोरट्यांसाठी आयते कुरणच ठरत आहे.
रात्रीच्या वेळेस पाना पेचकस घेऊन हे चोरटे शिवारात फिरत आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात हजारो कृषिपंपांची चोरट्यांनी वाट लावली आहे.
विशेष म्हणजे, कृषिपंपाची चोरी झाल्यानंतर संबंधित कास्तकारही सहसा पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार दाखल करण्यासाठी जात नाही. ही बाब चोर आणि पोलिसांच्याही पथ्यावर पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Criminalist thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.