चालक-वाहकांच्या मनमानीचा कळस
By Admin | Updated: October 22, 2014 23:13 IST2014-10-22T23:13:51+5:302014-10-22T23:13:51+5:30
बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सुट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करणे, वेळेची नियमितता न पाळणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे दिसत आहे.

चालक-वाहकांच्या मनमानीचा कळस
भंडारा : बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सुट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करणे, वेळेची नियमितता न पाळणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे दिसत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी असे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे घोषवाक्य आहे. परंतु याच घोषवाक्याचा विसर एसटी कर्मचाऱ्यांना पडलेला दिसत असून, बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे भंडारा, साकोली, पवनी तालुक्यातील प्रवासी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
भंडारा, साकोली, पवनी मार्गावर अनेक ठिकाणी बसस्थांबे आहेत. या ठिकाणी बस थांबविणे आवश्यक असताना बसचालक आणि वाहकही ती काळजी घेत नसल्याचे दिसते. बसचालकांच्या या मनमानीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. वेळेवर बस न मिळाल्याने त्यांची विविध कामेही खोळंबतात. त्याशिवाय प्रवास भाड्यावरूनही बसवाहक प्रवाशांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. प्रवाशांकडे नेमके सुटे पैसे नसल्यास त्यांना वाहकांकडून उद्धटपणाची वागणूक देण्यात येत. तिकिटावर लिहून उर्वरित पैसे नंतर देण्याचे सांगण्यात येते. परंतु प्रवास संपल्यानंतर प्रवासी वाहकांकडे उर्वरित पैशांची मागणी करतात त्यावेळी उलट प्रवाशांच्या उर्वरित पैशांचे गणित जुळवून त्यांच्याकडे दहा रूपये, वीस रूपयांची नोट देवून त्याचे सुटे घेवून हिशोब चुकता करण्याचा सल्ला देण्यात येतो, त्याशिवाय अनेक वाहक आणि चालक वेळेचे भानही ठेवत असल्याचे दिसत नाही. उपहारगृह किंवा इतर ठिकाणी उभे राहून गप्पा ठोकत असल्याचे दिसतात. त्यामुळे प्रवाशांना ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. (नगर प्रतिनिधी)