शिक्षण, संस्कारामुळे तंटामुक्त समाजाची निर्मिती
By Admin | Updated: August 10, 2014 22:50 IST2014-08-10T22:50:39+5:302014-08-10T22:50:39+5:30
कायदा फक्त सत्य स्थिती काय आहे ते सांगतो. पण त्यासाठी चांगले शिक्षण व आपले संस्कार अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. उदार शिक्षण व आपल्यांमधील संस्कारामुळेच तंटामुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते.

शिक्षण, संस्कारामुळे तंटामुक्त समाजाची निर्मिती
भंडारा : कायदा फक्त सत्य स्थिती काय आहे ते सांगतो. पण त्यासाठी चांगले शिक्षण व आपले संस्कार अंगी असणे अत्यंत आवश्यक आहे. उदार शिक्षण व आपल्यांमधील संस्कारामुळेच तंटामुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. असे न्यायमूर्ती व्ही.जी. धांडे यांनी व्यक्त केले.
जे.एम. पटेल महाविद्यालयात कायदा जनजागृती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून न्या. धांडे बोलत होते. हा कार्यक्रम भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महविद्यालयाच्या विज्ञान व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता. यात रॅगींग विरोधी कायदा, शिक्षणाचा अधिकार कायदा व सायबर कायदा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून न्या. व्ही.जी. धांडे उपस्थित होते. अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे, न्यायाधिश आर.डी. पतंगे (इंगळे), न्या.आर.डी. डफरे, न्या.एम.एल. अलोणे, प्रा.डॉ. कार्तिक पणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य ढोमणे म्हणाले, आपण सध्या सोशल मिडीयाच्या जगात वावरत आहोत. माहितीचे आदान प्रदान सोशल मिडीयामुळे शक्य झाले आहे. म्हणून माहितीचे आदान-प्रदान करताना मोठी दक्षता घेणे गरजेचे झाले आहे. क्षणामध्ये शेकडो लोकांना माहिती प्रदान करत असतो. म्हणून मिळालेल्या सेवेचा दुरुपयोग होता कामा नये.
न्या. पतंगे म्हणाल्या, रॅगींग विरोधी कायद्यामुळे समाजात जनजागृती होत आहे. महाराष्ट्र प्रतिबंधक रॅगींग विरोधी कायद्यात विविध बहुपयोगी टप्पे घालण्यात आले असून त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा बाहेर जगात त्याचा वापर सहजतेने करता येऊ शकतो. न्या. डफरे म्हणाल्या, सायबर लॉ मध्ये महत्त्वपूर्ण बाबींचा प्रावधान करण्यात आला आहे. त्यांनी हॅकिंग व क्रॅकिंग या दोन शब्दांचा विस्तृतपणे अर्थ समजावून सांगितला. मोबाईल फोन, इंटरनेट या साधनांचा वापर मानसिक त्रास किंवा छळण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे.
ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. न्या. अलोणे म्हणाल्या, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांना आहे. राईट टू एज्युकेशन हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून नि:शुल्क शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. प्रा.पणीकर यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)