सर्वंकष आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:30 IST2017-05-04T00:30:35+5:302017-05-04T00:30:35+5:30

‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या संकल्पनेवर आधारित येत्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ...

Create a comprehensive plan | सर्वंकष आराखडा तयार करा

सर्वंकष आराखडा तयार करा

सरासरी उत्पन्नात वाढ अपेक्षित : गट शेतीला महत्त्व, कृषि विकासाला प्राधान्य
भंडारा : ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ या संकल्पनेवर आधारित येत्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाने सर्वंकष व सर्वसमावेशक उत्पन्नवाढीचा आराखडा तात्काळ तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केल्या. जिल्ह्याचे सद्याचे सरासरी उत्पन्न, मागील तीन वर्षातील उत्पन्न, सर्वात जास्त उत्पन्न घेणारा तालुका, गाव व पीक पद्धती या बाबीचा अभ्यास करुन खरीप हंगाम २०१७-१८ साठी उत्पन्न वाढीचा उपाय व करावयाची कृती या आराखड्यात असणे अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपसंचालक माधुरी सोनवाने, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. शासनाने खरीप हंगाम २०१७-१८ या वर्षात उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण, प्रसार प्रसिध्दी, शेतकरी प्रशिक्षण, नाविन्यर्पूण बाबी, मृद आरोग्य व सेंद्रिय शेती, कांदा चाळ, नियंत्रित शेती आणि सुक्ष्म सिंचन या बाबीचा या मोहिमेत समावेश आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शेती उत्पन्न वाढीसंदर्भात महत्वाच्या सूचना केल्या. भंडारा जिल्ह्यात मुख्य पीक धान असून दुसऱ्या स्थानी बांधावरील तूर आहे. या व्यतिरिक्त अनेक शेतकरी विविध प्रयोग करीत असतात. या बाबी लक्षात घेता खरीपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांसाठी पेरणीपूर्व प्रशिक्षण आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात शेतकरी जे वाण वापरतात. त्याची उत्पादन क्षमता काय, कुठल्या भागात या वाणाचे जास्त उत्पादन होते. यावर संशोधन करण्यात यावे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात गट शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून गट शेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीचा प्रयोग यशस्वी करता येतो का? या बाबत कृषि विभागाने आढावा घ्यावा, गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना जिल्हाधिकारी यांनी मांडली आहे.
पारंपारिक पध्दती व्यतिरिक्त शेतात अभिनव प्रयोग करुन उत्पन्न वाढविणाऱ्या गटांना रोख स्वरुपात प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचा विचार जिल्हाधिकारी यांनी बोलून दाखविला. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून कृषि विभागाने प्रशिक्षण मोहिम हाती घ्यावी.या वर्षीच्या खरीप हंगामातील कृषि विभागाचा मुख्य उद्देश उत्पन्न वाढविणे हा असावा असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, यासाठी सरसकट प्रयत्न न करता काही मोजकी व ठराविक शेती गट यासाठी निवडण्यात यावे. याच क्षेत्रात लक्ष केंद्रीत करुन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी शेतकऱ्यांना लागणारे सर्व ते सहकार्य कृषि विभागाने करावे, असे ते म्हणाले. बँक कर्ज, खत, बियाणे, तांत्रिक सल्ला, सिंचन, मृद परिक्षण या सर्व बाबी लिंकअप करुन लावणीपासून ते काढणीपर्यंतची नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याचे सरासरी उत्पन्न हेक्टरी २० क्विंटल असून येत्या खरीप हंगामात सरासरी उत्पन्न २३ ते २५ क्विंटल दर हेक्टरी वाढविण्याचे उद्दिष्टय कृषि विभागाने निश्चित करावे व यासाठी एसओपी व सुक्ष्म नियोजन तयार करण्याचे निर्देश त्यांनी कृषि विभागाला दिले. कृषिला सर्वोच्य प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, पाण्याचा थेंब न थेंब साठविणे, शेती उत्पन्न वाढविणे यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Create a comprehensive plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.