मत्स्य व्यवसायाचे ब्रँड नेम तयार करा
By Admin | Updated: February 19, 2015 00:32 IST2015-02-19T00:32:05+5:302015-02-19T00:32:05+5:30
रोजगार देणाऱ्या मत्स्य व्यवसायाचे भंडारा जिल्ह्याचे ब्रँड नेम तयार करुन मासे निर्यात करण्यासाठीचा आराखडा जिल्हा प्रशासनाने सादर करण्याची सूचना ...

मत्स्य व्यवसायाचे ब्रँड नेम तयार करा
भंडारा : रोजगार देणाऱ्या मत्स्य व्यवसायाचे भंडारा जिल्ह्याचे ब्रँड नेम तयार करुन मासे निर्यात करण्यासाठीचा आराखडा जिल्हा प्रशासनाने सादर करण्याची सूचना राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०१५-१६ चा आढावा घेण्यात आला. या सभेस ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग विभागीय आयुक्त अनूपकुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वंदना वंजारी, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन आराखड्यातील अतिरिक्त मागणीचे तर्कशास्त्र काय आहे, वैशिष्ट्यपूर्ण योजना व रोजगार निर्मितीचा आराखडा या विषयावर आजच्या बैठकीत भर देण्यात आला. गाभा व बिगरगाभा क्षेत्राचा निधी ५०:५० टक्के करता येईल का यावर विचार करण्यात येईल असे ते म्हणाले. अंगणवाडी खोली बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियानातून निधी मिळत असल्याने जिल्हा नियोजन मध्ये अंगणवाडी खोली बांधकाम प्रस्तावित करु नये. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना शासन सुरु करत असून ग्रामीण भागातील रस्ते बांधकाम यापुढे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत प्रस्तावित करावेत, पांदण रस्ते तयार करण्यासाठी पोकलॅड व जेसीबी सारखी उपकरणे जिल्हा नियोजन मधून खरेदी करावी असेही अर्थमंत्र्यांनी सूचविले. जिल्ह्यातील मामा तलावाचे नुतनीकरण व खोलीकरण यासाठी मंजुरी देण्याचा विषय या बैठकीत आला असता विभागीय आयुक्तांनी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी व याबैठकीत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य मधुकर किंमतकर यांना बोलवावे, अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या. जिल्ह्याचा २०१५-१६ चा प्रारुप आराखडा ७० कोटी २७ लाखाचा असून जिल्ह्याची ८४ कोटी ४२ लाखाची अतिरिक्त मागणी आहे. योजनेत प्रस्तावित केलेला निधी वाढवून मिळेल असे अर्थमंत्री म्हणाले. भंडारा जिल्ह्यात मामा तलावाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मत्स्य व्यवसायाला वाव आहे. जिल्ह्यातील मासे निर्यात करण्यासाठी प्रशासनाने मत्स्य व्यवसाय ब्रँड नेम तयार करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे, उपवनसंरक्षक विनय ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
मत्स्य व्यवसाय व दुग्ध व्यवसायाची विदर्भासाठी ब्रँड नेम असावेत यासाठी सचिव व आयुक्तांची चचा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. रेशीम उद्योगाला भंडारा जिल्ह्यात खूप वाव आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी व उच्च दर्जाचे रेशीम उत्पादन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तांदूळ आधारित उद्योगावर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील उत्पादनाचा त्याच जिल्ह्यात उपयोग व्हावा असे सांगून शालेय पोषण आहार म्हणून तांदळापासून तयार केलेले उत्पादन देता येतील का यासाठी महिला व बाल कल्याण विभागाच्या सचिवाशी चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले. जिल्ह्याची आवश्यकता बघूनच योजना तयार करावी. प्रायोगिक तत्वावर जिल्हयात यांत्रिक शेतीचा प्रयोग राबवावा. प्रत्येक जिल्ह्याने रोजगार निमिर्तीची एकतरी योजना अर्थसंकल्पीय भाषणासाठी सूचवावी, असेही त्यांनी सांगितले.