पाणलोट समिती निवड प्रक्रियेतून गदारोळ
By Admin | Updated: November 15, 2014 01:19 IST2014-11-15T01:19:05+5:302014-11-15T01:19:05+5:30
पाणलोट समिती निवड प्रक्रियेवरून मोहाडी खापा गावात वादळ निर्माण झाले आहे. दि.१२ ला आयोजित सभेत दोन गटात तणाव वाढल्याने निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

पाणलोट समिती निवड प्रक्रियेतून गदारोळ
चुल्हाड (सिहोरा) : पाणलोट समिती निवड प्रक्रियेवरून मोहाडी खापा गावात वादळ निर्माण झाले आहे. दि.१२ ला आयोजित सभेत दोन गटात तणाव वाढल्याने निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. या सभेत पोलिसांना पाचारण करण्यात आले असून पुढील निर्णय तुमसरच्या बीडीओ घेणार आहेत.
गावातील शेती विषयक कामे करण्यासाठी शासनाने पाणलोट योजना आणली आहे. ग्रामसभेत निवड करण्यात आलेली पाणलोट समिती अंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीत विकास कामे केली जाणार आहे. याशिवाय समितीच्या सचिवांना मासिक मानधन दिले जाणार आहे.
जवळपास या समितीला गावात विकास कामे करण्यासाठी २० लक्ष रूपयाचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. यामुळे गावा गावात समिती निवड प्रक्रिया अंगावर धावून जाणारी ठरत आहे. गेल्या महिना भरापासून मोहाडी खापा गावात पानलोट समिती निवड करण्याच्या मागणी वरून वाद सुरू आहे.
आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. या योजनेत पैसा आहे. श्रमदान नाही. यामुळे समितीत स्थान प्राप्त करण्यासाठी गावात स्पर्धा सुरू झाली आहे. या समितीत राजकारण शिरल्याने निवड प्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. मोहाडी खापा गावात पानलोट समितीची निवड प्रक्रिया राबविण्यासाठी दि.१२ ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या सभेत गावातील ५०० नागरिकांनी सहभाग घेतला आहे. सभेत मंडळ कृषी अधिकारी उईके, सहायक अधिकारी राऊत, अन्य दोन कर्मचारी या शिवाय सचिव नागदेवे व सरपंच विमला कानतोडे उपस्थित होते.
निवड प्रक्रिया सुरू करताना आधी शासनाचे परिपत्रक निकष आणि नियम वाचून दाखविण्यात आले आहे. आधी समितीचे अध्यक्ष आणि १३ सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एका गटाने धनराज बुद्धे तर दुसऱ्या गटाने ओमप्रकाश शरणागत याचे नाव अध्यक्ष पदासाठी दिले. एका पदासाठी दोन गावे आल्याने सभेत गोंधळ उडाला. शासनाच्या परिपत्रकानुसार ही प्रक्रिया राबविणार असल्याची भूमिका कृषी अधिकाऱ्यांनी घेतली.
या नियमांना झुगारत एका शिक्षकाने शासनाचे परिपत्रक हिसकावले. नियमात नसतानाही अध्यक्ष व सचिवाची निवड आजच करण्याची अट लावून धरली. सचिवाची निवड १० दिवसाच्या कालावधीत करण्याचे परिपत्रकात नमून आहे. या निवड प्रक्रियेत शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्याचे अटी आहेत. यामुळे सचिवाची निवड तुर्तास केली जाणार नाही, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला असता अंगावर धावून जाण्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे दोन्ही गट आमने सामने आली. ग्रामसेवकाला टारगेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता वाढत्या तनावामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. दोन्ही गटाच्या सदस्यांना तंबी दिल्या नंतर तनाव निवळला.
या दरम्यान निवड प्रक्रिया होणार असल्याचे लक्षात येताच ही या सभेत पानलोट समिती निवड पुढे ढकलण्यात आली.वाढत्या गोंधळ आणि तनावामुळे समितीची निवड करण्यात आली नाही. यानंतर कृषी विभागाचे अधिकारी सभेतून निघून गेले. पानलोट वरून आयोजित ग्रामसभा गाजताच निवड प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. (वार्ताहर)