लाखांदूर येथील कोविड केअर सेंटर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:43+5:302021-04-08T04:35:43+5:30
लाखांदूर : गतवर्षी कोरोना संसर्ग काळात रुग्णांसाठी आधार ठरलेले येथील कोविड केअर सेंटर गत दोन महिन्यांपासून बंद आहे. आता ...

लाखांदूर येथील कोविड केअर सेंटर बंद
लाखांदूर : गतवर्षी कोरोना संसर्ग काळात रुग्णांसाठी आधार ठरलेले येथील कोविड केअर सेंटर गत दोन महिन्यांपासून बंद आहे. आता जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरणासाठी आणि उपचारासाठी कोविड रुग्णांना थेट भंडाऱ्याला पाठवावे लागत आहे. यामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
गतवर्षी कोरोना संसर्ग होताच लाखांदूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर उघडण्यात आले. एप्रिल महिन्यात सुरू झालेले हे केंद्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सुरू होते. या केंद्रांतर्गत तालुक्यातील जवळपास ६८२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. येथे औषधोपचारासह विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, कोणतीही सूचना न देता फेब्रुवारी महिन्यात तालुका प्रशासनाने कोविड रुग्ण नसल्याच्या कारणावरून संबंधित वसतिगृहातील केंद्र बंद केले.
दरम्यान, गत काही दिवसांपासून आरोग्य विभागांतर्गत गावागावात कोविड चाचणी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणासाठी तालुक्यात कुठेही सुविधा नाहीत. त्यामुळे त्यांना थेट भंडारा येथील जिल्हा कोविड केंद्रात दाखल करण्यात येत असल्याची माहिती आहे. तालुक्यातील पालेपेंढरी, हरदोली, विरली बुज. या तीन गावांत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले. तिन्ही गावे प्रतिबंधित करण्यात आली. येथील रुग्णांना आवश्यक उपचार व विलगीकरणाची सूचना मिळत नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तालुका प्रशासनाने तात्काळ बंद केलेले कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
बाॅक्स
भंडारा येथे रुग्णांची आर्थिक पिळवणूक
लाखांदूर तालुक्यातील अनेक रुग्ण भंडारा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होताच उपचारादरम्यान त्यांना सीटी स्कॅनअंतर्गत एचआर सीटी चाचणी करण्याची सूचना दिली जाते. शासकीय रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्र बंद असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा रुग्णांना खासगी ठिकाणावरून सीटी स्कॅन करावे लागत आहे. त्यात रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे.
कोट
लाखांदूर तालुक्यात कोविड केअर सेंटरची सध्या सुविधा उपलब्ध नाही. मात्र, वैद्यकीय मार्गदर्शनात काही कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. काहींना भंडारा येथील कोविड केअर केंद्रात पाठविण्यात आले.
-डाॅ.नलिनीकांत मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी, लाखांदूर.