कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीच्या नावावर निधीची अफरातफर

By Admin | Updated: June 10, 2016 00:53 IST2016-06-10T00:53:38+5:302016-06-10T00:53:38+5:30

१३ वा वित्त आयोग जिल्हा नाविन्यपुर्ण योजना २०१४-१५ अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम रेंगेपार कोठा हद्दीत वा सिमाक्षेत्रात न करता...

Corruption of funds in the name of Kolhapuri Bandra Amendment | कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीच्या नावावर निधीची अफरातफर

कोल्हापुरी बंधारा दुरूस्तीच्या नावावर निधीची अफरातफर

अधिकाऱ्यांची चुप्पी : फलका वरून जनतेत संभ्रम, ग्रामसेवक म्हणतात आरोप बिनबुडाचे
लाखनी/सालेभाटा : १३ वा वित्त आयोग जिल्हा नाविन्यपुर्ण योजना २०१४-१५ अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम रेंगेपार कोठा हद्दीत वा सिमाक्षेत्रात न करता दैतमांगलीच्या पुलाजवळ कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम पूर्ण केल्याचे दाखवून शासकीय निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा महाप्रताप नरेश शिवनकर सचिव ग्रामपंचायत रेेंगेपार कोठा यांनी केल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे.
लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा ग्रामपंचायतचे विद्यमान सचिव नरेश शिवनकर यांनी १३ व्या वित्त आयोग जिल्हा नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीचा काम ९ डिसेंबर २०१४ ते २१ डिसेंबर २०१४ या कालावधीत केला. सदरील कामास मंजुरी पत्र कार्यारंभ आदेश सचिव ग्रामपंचायत रेंगेपार कोठा यांना मिळाला. घड्याळी तासाप्रमाणे प्रतिदिन चार तास प्रमाणे १३ दिवसात एकूण ५२ तास केले. कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती कामावर ६,४३, ४८९ रूपये खर्ची करण्यात आले. परंतु कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीचे काम रेंगेपार कोठा गावाच्या परिसरात, हद्दीत वा सिमाक्षेत्रात दिसतच नाही. सदर कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीचे काम दैतमांगली गावाजवळील पुलाला लागून असलेल्या भिंतीवरील फलका वरून दिसताच जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती कामाबाबद ग्रामस्थांनी विचारणा केली असता कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम वसंतराव पमा काडगाये यांचे शेताजवळ झाल्याचे नरेश शिवनकर सचिव ग्रा.पं. रेंगेपार कोठा यांनी सांगितले.
दैतमांगली गावावरून मेंढा-सोमलवाडाकडे जाणारा ३ कि़मी. रस्ता आहे. मेंढा, सोमलवाडा ते दैतमांगली दरम्यान नाला असून नाल्यावर बऱ्याच वर्षापूर्वी पुल बांधलेले आहे. पुलाच्या एका कडेला अंदाजे ५ फुट उंचीची एक भिंत आहे. त्याच जुन्या भिंतीची डागडुजी करून कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीच्या कामाचे छायाचित्र काढून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्याचा अनोखा प्रकार सचिव नरेश शिवनकर यांनी केला आहे. डागडुजी केलेल्या भिंतीवर माहिती फलक लिहिलेला आहे. परंतु माहिती फलकावर अंदाजपत्रकीय रक्कम, कामावर झालेली खर्ची रक्कम, कामाचा कालावधी आदी माहिती लिहिलेली नाही. पण कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती काम ग्रा.पं. रेंगेपार कोठा हे विधान लिहिण्यास विसर पडली नाही हे मात्र विशेष.
कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती काम २३ जानेवारीला झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले तर ३० मार्चला धनादेश क्रमांक २११४३ रूपये ५,१८,२६३ च्या धनादेशावर सहायक लेखा अधिकारी ल.पा.जि.प. भंडारा व कार्यकारी अभियंता भंडारा यांच्या स्वाक्षरीने सचिव ग्रा.पं. रेंगेपार कोठा या नावाने देण्यात आलेला आहे. १३ वा वित्त आयोग जिल्हा नाविन्यपूर्ण योजना २०१४-१५ अंतर्गत कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीची निधी खर्ची करून दैतमांगली गावात काम होतो. रेंगेपार कोठा येथे प्रत्यक्ष काम दिसत नाही हे उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल. कोल्हापूरी बंधारा दुरूस्ती कामात लाखो रूपयाची अफरातफर करण्यात संबंधित अधिकाऱ्यांचाही हात असावा, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)

Web Title: Corruption of funds in the name of Kolhapuri Bandra Amendment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.