Corona vaccine to 13,000 citizens in the district | जिल्ह्यात 13 हजार नागरिकांना कोरोना लस

जिल्ह्यात 13 हजार नागरिकांना कोरोना लस

ठळक मुद्दे११३३ ज्येष्ठ नागरिक : ८३४९ आरोग्य कर्मचारी, ६८२१ फ्रंटलाईन वर्कर

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत १३ हजार ४०२ नागरिकांनी कोरोनाची लस  घेतली आहे. त्यात ११३३ ज्येष्ठ नागरिकांसह ८३४९ आरोग्य कर्मचारी आणि ६८२१ फ्रंटलाइन वर्करचा समावेश आहे. जिल्ह्याला उद्दिष्टाच्या ८८ टक्के एवढे लसीकरण करण्यात आले आहे. 
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत लसीकरणाला जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर मिळून १५ हजार १७० असे उद्दिष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत उद्दिष्टाच्या ८८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, तर जिल्ह्यात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील अति जोखमीच्या आजारी रुग्णांना लसीकरणास प्रारंभ झाला आहे. ४५ ते ६० वयोगटात ९० व्यक्तींना तर ६० वर्षांवरील १०३४ नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लसीकरणात ऑनलाइनचा बाधा येत आहे. लस घेतल्यानंतर कुणालाही त्रास झाल्याच्या तक्रारी मात्र नाहीत.  ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आजार असलेल्या लाभार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून लसीकरण ज्या तालुक्यात करावयाचे आहे त्या तालुक्यातील रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावयाचे आहे. ऑनस्पाॅट रजिस्ट्रेशनही करता येणार आहे.

लसीकरणाचे केंद्र
 भंडारा येथील जिल्हा रुग्णालय, टीबी रुग्णालय, गणेशपूर व परसोडी येथील आरोग्यवर्धीनी केंद्र, तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय, खापा येथील आरोग्यवर्धीनी केंद्र, गोबरवाही व नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पवनी येथे ग्रामीण रुग्णालय आणि कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय, लाखांदूर, मोहाडी आणि लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात नि:शुल्क लसीकरण करण्यात येत आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत भंडारा येथील पेस हॉस्पिटल, इंद्राक्षी हाॅस्पिटल आणि साकोली येथील पार्वती हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी स्वयंनोंदणी संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे.

कोरोना लस घेण्यासाठी केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. नागरिकांनी गर्दी न करता वेळेचे नियोजन करून लसीकरणासाठी उपस्थित राहावे. सकाळी ९ ते सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ आहे. दुपारच्या वेळी तुलनेत कमी नागरिक येतात. नागरिकांनी गर्दी न करता वेळेचे नियोजन केल्यास लसीकरण सुकर होईल. 
-संदीप कदम, जिल्हाधिकारी

३०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात गत महिन्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०० च्या आत होती. मात्र आता ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, गुरुवारी जिल्ह्यात ३०० ॲक्टिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात १६१ आहेत. दरम्यान, गुरुवारी ४१ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, १५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी ३०० रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात १६१, मोहाडी १७, तुमसर ४८, पवनी २६, लाखनी ३७, साकोली ६ आणि लाखांदूर तालुक्यातील ५ ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी १,५७९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात ३१, पवनी ४, मोहाडी आणि लाखनी येथील प्रत्येकी २ तर तुमसर आणि साकोली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार २०५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १३ हजार ८१२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी १३ हजार १८५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या मृतांची संख्या ३२७ आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाही. सर्वत्र गर्दी होत असल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

 

Web Title: Corona vaccine to 13,000 citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.