कोरोना वाढला, एसटीच्या प्रवासी संख्येत झाली घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:31+5:302021-02-23T04:53:31+5:30
राज्यातील प्रवाशांचा भार वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापासून भंडारा विभागदेखील सुटला नाही. भंडारा विभागात ...

कोरोना वाढला, एसटीच्या प्रवासी संख्येत झाली घट
राज्यातील प्रवाशांचा भार वाहणाऱ्या एसटीची संपूर्ण राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापासून भंडारा विभागदेखील सुटला नाही. भंडारा विभागात भंडारा व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे. यात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, पवनी, तिरोडा असे मिळून भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. भंडारा विभागाअंतर्गत असलेल्या एसटी बसेस दररोज लाखो किलोमीटरचा प्रवास करीत होत्या. लॉकडाऊनमध्ये हा प्रवास थांबला. लॉकडाऊनचा नियम शिथिल होताच मागणीनुसार एसटीच्या ८० टक्के बसफेऱ्या सुरू झाल्या. यातून दररोज एसटी महामंडळाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत होते. राज्यात आता कोराेनाने पुन्हा डोके वर काढल्याने एसटीच्या उत्पन्नाला पुन्हा ब्रेक लागला आहे. लांबपल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू असल्या तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून स्वतः प्रवास करणे थांबविले आहे. सोशल डिस्टन्स आणि मास्कचा तंतोतंत वापर होत नसल्याने अनेक प्रवाशांनी एसटीतून प्रवास करणे कमी केले आहे. भंडारा विभागातंर्गत सध्या ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. लाॅऊडाऊनपूर्वी ५० ते ६० हजार प्रवासी एसटीने दररोज प्रवास करीत होते. लाॅकडाऊन खुला केल्यानंतर कोरोनाची धास्ती मनात बाळगून १० हजार प्रवासी प्रवास होते. भंडारा विभागाअंतर्गत वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, माहूर आदी लांबपल्ल्याच्या एसटी बसेस धावतात. या बसेसना चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढल्याने लांब पल्ल्याच्या एसटी बसेसमधील प्रवासी कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया, नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर सर्वाधिक प्रवासी मिळत होते. सर्वाधिक बसेस याच मार्गावर धावत होत्या. मात्र, काही दिवसांपासून या मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत थोडीफार घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जवळपास अनेक जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परिणामी प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. येत्या काळात यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे.
बॉक्स
नागपूर मार्गावर निम्मे प्रवासी
सर्वाधिक प्रवासी असलेल्या नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत असतानाच मोठ्या शहरात कोरोनाचे प्रमाण वाढल्याने नागपूर मार्गावर प्रवासीसंख्या निम्मी झाली आहे.
बॉक्स
२० टक्के मार्गावरील एसटी बंदच
कोरोना संकटकाळात एसटीचे दिवाळी निघाले. त्यानंतर काही प्रमाणात शिथिलता मिळताच एसटीचा प्रवास सुरू झाला. असे असले तरी या नियमांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ८० टक्के मार्गावरील बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, आजही २० टक्के मार्गावरील बसेस बंद ठेवण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. यात भंडारा ते डोंगरी बु., कवडसी, विरली, गोठणगाव आदी ग्रामीण भागात आजही बससेवा बंदच आहे. सध्यास्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लांबपल्ल्याच्या गाड्या काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश निघाल्याची माहिती आहे.
बॉक्स
ना मास्क, ना डिस्टंसिंग
भंडाराच्या बसस्थानकात रविवारी प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी दिसून आली. बसस्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट दिसून आली नाही. सोशल डिस्टन्स, मास्क यांचा वापर करणारे प्रवासी कमी प्रमाणात आढळून आले तसेच अजूनही अनेकांच्या चेहऱ्याला मास्क नसल्याचे दिसून आले. भंडारा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर सुरक्षारक्षक मास्क लावण्याची विनंती अर्ज करीत असल्याचे दिसून आले.
६०,००० जिल्ह्यात दररोज होणारा एसटीचा प्रवास
१०,००० लाॅकडाऊन खुला केल्यानंतरचा प्रवास
४०,००० एसटीचा सध्याचा प्रवास